Thursday, May 9, 2024
Homeनगरविनाकारण फिरणार्‍या 250 जणांवर नगर शहरात सोमवारी कारवाई

विनाकारण फिरणार्‍या 250 जणांवर नगर शहरात सोमवारी कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना या साथरोगाचा संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. रविवारच्या जनता कर्फ्यू नंतर लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी बंदी आदेश डावलून रस्त्यांवर फिरणार्‍या सुमारे 250 जणांवर कारवाई केली. बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात 14 पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत 125, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत 100, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 25 जणावर प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना संसर्ग आजार टाळण्यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश चार दिवसापूर्वी जारी केले आहेत.

- Advertisement -

या आदेशाचे नागरिकांकडून पालन होताना दिसत नव्हते. शेवटी प्रशासकीय पातळीवर कारवाईचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. नगर शहरात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक सागर पाटील रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. नगर शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांची पथकासह तीन दिवसांपासून गस्त सुरू आहे. आज दुपारी देखील नगर शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. 17 ते 22 मार्चपर्यंत जिल्ह्यात 271 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, 20 जणांना समज देत सोडून देण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्यांचे प्रमाण नगर शहरात जास्त आहे. जनता कर्फ्यूनंतर सोमवारी लोकांचे रस्त्यावर येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नगर शहरामध्ये सोमवारी सर्वाधिक सुमारे 250 लोकांवर प्रतिबंधात्म कारवाई केली आहे.

नगर शहरात येणारे सर्व रस्ते बंद

ठिकठिकाणी नाकाबंदी; विनाकारण बाहेर आलेल्या लोकांवर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. नगर शहरासह जिल्ह्यात जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतूू, एक दिवस घरात राहिल्यानंतर सोमवारी लोकांनी रस्तावर मोठी गर्दी केली होती. भाजीपाला खरेदी, किराणा खरेदीसाठी लोक रस्तावर आले होते. यामुळे जनता कर्फ्युला मिळालेल्या प्रतिसादाचा उपयोग झाला नसल्याचे एकंदरीत चित्र होते. यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरात येणारे व शहराअंतर्गत असलेले सर्व रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

पुण्याकडून येणारा रस्ता केडगाव बायपासवर बंद करण्यात आला आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांसह कोतवाली पोलिसांकडून याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादकडून शहराकडे येणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण बायपास रस्ता नेप्ती नाकावर बंद करण्यात आला आहे. अत्याआवश्यक सेवेसाठी ओळखपत्रांचा पुराव असेल तर शहरामध्ये सोडण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे.

शहरातून जाणारे पाथर्डी, जामखेड व दौंड महामार्ग पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आले नाही. परंतू, याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ओळख पुरावा असेल तर सोडण्यात येत आहे. विनाकारण प्रवास करणार्‍याला समज देऊन सोडण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच घर सोडण्याचे आवहान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शहरामध्ये सोमवारी लोकांनी रस्तावर मोठी गर्दी केली होती. यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रस्तावर उतरून लोकांना घरामध्ये थांबण्याबाबत सुचना केल्या. काही लोक विनाकारण रस्तावर दिसले तर त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्म कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. रस्तावर वाढती गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी दुपारनंतर शहराअतंर्गत वाहतूकीसाठी असलेले रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

कापडबाजाराकडे जाणारे रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचबरोबर भिंगारवाला चौक, तेलिखुंट, चितळेरोड, बालिकाश्रमरोड, सावेडी परिसरातील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांकडून नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत होती. ओळखपत्र जवळ नसेल, विनाकारण रस्तावर फिरणार्‍याविरोधात प्रतिबंधात्म कारवाई करण्यात येत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या