नेवासा येथील आढावा बैठकीत ना. गडाखांनी दिले 461 तक्रारींच्या निपटार्‍याचे आदेश

jalgaon-digital
3 Min Read

सत्कार सोहळा बाजूला ठेवत 6 तास जनतेशी संवाद; अनेकांचे प्रश्न लावले मार्गी

नेवासा (शहर प्रतिनिधी, तालुका वार्ताहर)- राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नेवासा तहसील कार्यालयात आलेल्या ना. शंकरराव गडाख यांच्या सत्काराचे प्रशासनाने नियोजन केले होते. परंतु हार-तुरे नको म्हणत मोठ्या संख्येने आलेल्या सामान्य जनतेशी थेट वैयक्तीक संवाद साधत त्यांनी आढावा बैठक घेतली. पाच तास बसून जनतेचे प्रश्न समजावून घेताना सर्व विभागांच्या 461 तक्रारींच्या निपटार्‍याचे आदेश त्यांनी दिले.

सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय आवारात नामदार गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठीकासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. नामदार झाल्यानंतर श्री. गडाख प्रथमच तहसील कार्यालयात येत असल्याने प्रशासनासह अनेकांनी मोठ्या प्रमाणात बुके, हार यांची व्यवस्था केली होती. बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी नामदार गडाखांचा सत्कार करण्याचे प्रयोजन होते. परंतु नामदार गडाख बैठकस्थळी येताच सामान्य जनतेचा मोठा गराडा पडला. त्यामुळे प्रशासनाने आपली कामे घेऊन आलेल्या जनतेला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी नामदार गडाख यांनी सर्व सोपस्कार बाजूला ठेवत सत्कारला विनम्रपणे नकार देत सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्याला प्राधान्य दिले. कामे घेऊन आलेल्या प्रत्येकाशी थेट वैयक्तीक संवाद साधत प्रत्येक अधिकार्‍याला सूचना देत कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. महसूल, सहकार, पोलीस, वीज, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग यांच्या तब्बल 461 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावेळी सुमारे 2000 लोक उपस्थित होते .

तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे विविध शासकीय तसेच निमशासकीय स्तरावरील प्रलंबित प्रश्नांचा त्वरेने निपटारा व्हावा, अधिकारी-कर्मचारी लोकाभिमुख व्हावेत या हेतूने ना. गडाख यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस सर्वच विभागांच्या संबंधितांनी उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर लोकांच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली जाणार आहे.

यावेळी अनेक वृद्ध तक्रारी घेऊन आले होते. त्यांना प्राधान्य देत नामदार गडाखांनी स्वतः त्यांच्या समस्या मार्गी लावल्या. यावेळी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनावर वचक ठेवणारा लोकप्रतिनिधी असेल तर जनतेची कामे झटपट मार्गी लागतात. ती धमक नामदार गडाखांमध्ये असल्याने सर्वच विभागांचे अधिकारी जातीने उपस्थित होते.

नाही तर यापूर्वी पदाधिकारी हजर असायचे जनता पोटतिडकीने आपले प्रश्न माडांयची परंतु अधिकारी मात्र दांड्या मारत होते असा अनुभव आल्याच्या प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केल्या. बैठकीपूर्वी नामदार गडाख यांनी अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून काम का पूर्णत्वास गेले नाही याची माहिती घेतली.

सर्व विभागातील अधिकार्‍यांना ना. गडाख यांनी जाहीरपणे सांगितले की ,माझ्यासह आपल्या सर्वांची पदे जनतेसाठीच आहे. शेतकरी, गोरगरीब जनता, छोटे मोठे व्यावसायिक यांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नका. त्यांच्याशी आपुलकीने वागा, शासकीय योजनेची माहिती द्या असेही ना. गडाख म्हणाले.

तालुक्यातील जायकवाडी पट्ट्यातील अनेक गावामंध्ये न्यायालयाचा आदेशाने प्रशासन पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांवर कारवाई करत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ना. गडाख यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकर्‍यांच्या पाणी परवान्याचे नुतनीकरण संदर्भात प्रामाणिक प्रयत्न करून लवकरच जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार गडाख यांनी शेतकरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *