फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष काम करा
Featured

फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष काम करा

Sarvmat Digital

नेवासा तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ना. गडाख यांच्या अधिकार्‍यांना सूचना

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकार्‍यांनी फक्त कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी दिली. नेवासा तालुका खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या निवासस्थानी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते.

नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. बी-बियाणे, खते शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात तसेच निर्धारीत वेळेत व किंमतीत उपलब्ध होण्यासाठी अधिकार्‍यांनी सजग राहण्याची सूचना ना. गडाख यांनी यावेळी केली. शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांची माहिती अभियान राबवून शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकर्‍यांच्या कार्यशाळा नियमित घेतल्याच गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

केंद्र सरकारने पीक विमा ऐच्छिक केला असल्याचे तालुका कृषी अधिकार्‍यांनी स्पष्ट करताच याबाबत शेतकर्‍यांना जनजागृतीद्वारे माहिती देऊन येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त पीक विमा उतरविण्यास उद्युक्त करावे, कारण अवकाळी, अवर्षण तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास पीक विम्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना भरपाई मिळत असल्याचे ते म्हणाले.

2019 च्या खरीप हंगामातील तालुक्यातील 16 हजार 850 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, बाजरी या पिकांच्या नुकसानीपोटी 25 कोटी रुपये तर डाळिंब, पेरू, संत्रा या फळबागांना 1 कोटी 94 लाख रुपये इतकी रक्कम पीक विम्यापोटी मागील महिन्यात शेतकर्‍यांना मिळाल्याची माहिती अधिकार्‍यांनी यावेळी दिली. ठिबक सिंचन योजनेसाठी तालुक्यातून 11 हजार 915 अर्ज प्राप्त झाले असून त्यांना 80 टक्के अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत तालुक्यात 644 शेततळी पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी यावेळी दिली.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्यासह विविध विभागांचे मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते.

पीक विम्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

केंद्र सरकारने पीक विमा ऐच्छिक केलेला असल्याने शेतकर्‍यांनी जागृत राहून जास्तीत जास्त प्रमाणात पीक विमा उतरविण्याचे आवाहन ना. शंकरराव गडाख यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com