Thursday, April 25, 2024
Homeनगरमहसुलने खोदलेल्या खड्ड्याला वाळूतस्करांकडून हुल!

महसुलने खोदलेल्या खड्ड्याला वाळूतस्करांकडून हुल!

बाभुळगाव गंगा, भालगाव, लाख बापतरा शिवारातून बेसुमार वाळूउपसा सुरु

नाऊर, वैजापूर (वार्ताहर)- गेल्या 1 ते दीड महिन्याभरापासून गोदावरी पात्रातून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर, पीकअपच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. या भागातील काही ठराविक वाळूतस्करांसह बाहेरील तालुक्यातील तस्करांनी हातभार लावल्याने या भागातून सर्रासपणे अवैध वाळु व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. दैनिक सार्वमतच्या वृत्तानंतर वैजापूर तहसिलदार महेंद्र गिरमे यांच्या पथकाने सुरू असलेल्या वाळु वाहतुकीच्या ठिकाणी खड्डा खोदून रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या या खड्ड्याला हुल देऊन त्याच्या बाजुनेच रस्ता करुन वाळु वाहतूक जोमात सुरू केली आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली जात असून वाळु मोकळी होत चालली आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वर काढून ठरलेल्या पाँईटवर टाकून हीच वाळु बाहेरील ट्रक, डंपरच्या साहाय्याने सर्रासपणे वाळुची वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णता: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वरील 3 ते 4 ठिकाणाहून अंदाजे 40 ते 50 वाहनांतून ही वाहतूक सुरू असल्याने जवळपास दैनदिन हजारो ब्रास वाळु उपसा केला जात आहे.

वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा, भालगाव, लाख बापतरा या परिसरातून रोजच रात्रीच्या वेळी वैजापूर तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील वाळु तस्करांनी सध्या स्थितीत वाळुचा उपसा जोरदारपणे सुरू केला आहे. त्यामुळे या वाळु तस्करांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. हा वाळु उपसा रात्रीचा सुरू असून काही वाहने नाऊर मार्गे तर काही वाहने सावखेड गंगा- लाडगाव, बाभुळगाव मार्गे सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

ही वाळु वाहतूक श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या गट. न.117 मधील हद्दीतून बिनधास्तपणे सुरू असून याकडे महसुल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या वाळूतस्करांना वेळीच पायबंद घातला गेला नाही तर या भागात मोठी गुन्हेगारी फोफावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवैध वाळु व्यावसायिकांनी काही तरूणांची पंटर म्हणून नेमणूक केली असून हेच पंटर कोणाची गाडी आली, गेली याची खबर तस्करांपर्यंत पोहचवत असल्याने प्रशासनास कारवाई करण्यास अडचण येत असते. मात्र अगोदर या पंटरवरच कारवाई झाल्यास तस्करांना पकडणे अवघड नसल्याचे बोलले जात आहे. या प्रश्नी औरगांबादच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात श्रीराम मंदिर देवस्थानचे महंत दळवी महाराज यांनी देखील भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीचा पाण्याचा निर्माण होणारा गंभीर प्रश्नासह वाढत असलेली दादागिरी प्रश्नी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना लेखी स्वरूपात कळवले आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी अवैध वाळु व्यवसाय करणार्‍यांवर काय कारवाई करणार? याकडे परिसराचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या