‘आयएसओ’ नुतनीकरण न केल्याने 65 शाळांचे साडेसात लाख पाण्यात
Featured

‘आयएसओ’ नुतनीकरण न केल्याने 65 शाळांचे साडेसात लाख पाण्यात

Sarvmat Digital

नगर तालुक्यातील परिस्थिती : दर्जा व पटसंख्येबाबत प्रश्नचिन्ह

अहमदनगर (वार्ताहर)- जिल्हा परीषद शाळेने आयएसओ मानकंन प्रमाणपत्राचे नुतनीकरण न केल्यामुळे 65 शाळांचे साडेसात लाख रुपये पाण्यात गेले. नुतनीकरण न केल्यामुळे हे प्रमाणपत्र रद्दीत जमा होणार. आता या शाळेचा दर्जा व पटसंख्येबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परीषद शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी व खाजगी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत आकर्षित करण्यासाठी, शाळेची पटसंंख्या वाढवण्याासाठी नगर तालुुक्यातील 65 जिल्हा परिषद शाळा 2014, 15 ला आयएसओ झाल्या. मात्र, पाच वर्षे उलटूनही या शाळेची कुठल्याही प्रकारची फेरतपासणी झाली नाही.

आयएसओ करणार्‍या कंपनीने 65 शाळांची अकरा हजार रुपयेप्रमाणे सात लाख पंधरा हजार रुपये जमा केले. शाळा आयएसओ करण्यासाठी या कंपनीने 42 पद्धतीचे निकष घालून दिले होते. मात्र, काही शाळांमध्ये निकष अपूर्ण असतानाही शाळेला अकरा हजार रुपये घेऊन आयएसओ मानांकन 2014-15 साली देण्यात आले होते.

शाळा आयएसओ करण्यासाठी शिक्षकांनी तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून अकरा हजार रुपये आयएसओ कंपनीला दिले. शाळेतील बाह्य अंग सुधारण्यासाठी रंगरगोटीसाठी दहा हजार रुपये खर्च केले असे जवळपास वीस हजार रुपये खर्च शाळेला आला.

आयएसओ प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थाटामाटात झाला. मात्र, तीन वर्षांनी या शाळेची फेर तपासणी करून आयएसओ प्रमाणपत्र नुतनीकरण करणे गरजेचे होते. मात्र, या कंपनीने कुठल्याही शाळेला भेट देऊन प्रमाणपत्र नुतनीकरण करून घेतले नाही. यामुळे या सर्व शाळांचे आयएसओ प्रमाणपत्र रद्द झाले आहेत.

आता महानगरपालिकेच्या शाळा आयएसओ करण्याच्या मागे लागल्या आहेत. मनपाच्या तीन शाळांनी अकरा हजार रुपये भरून शाळा आयएसओ केल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणेच मनपाच्या शाळाही आयएसओच्या जाळ्यात अडकत चालल्या आहेत.

आयएसओ झालेल्या शाळा
खडकी, खंडाळा, दत्तनगर, वाकोडी, अरणगाव, वाकी वस्ती, इमामपूर, पोखर्डी, तोडमलवाडी, भातोडी, भातोडी उर्दू, चिंचोडी, चिंचोडी ऊर्दू, सांडवे, निंबोडी, मदडगाव, दरेवाडी, टाकळी काझी, नारायण डोह, वडाची वस्ती, हराळ मळा, पाऊतका वस्ती, आनंद मळा, दावल मालिक, जगदंबा मळा, तुकाईमळा, कुताळमळा, गुंडेगाव, टाकळी खातगाव, निंबळक, जलशुध्दीकरण, बुर्‍हाणनगर, पिंपळगाव वाघा, पिंपळगाव कौडा, नांदगाव, रानमळा, केडगाव, जपकर वस्ती, कांबळे वस्ती, नेफ्ती, शिवाजीनगर, भूषणनगर, जगदंबा क्लास, शाहुनगर, केडगाव उर्दू, देऊळगाव सिद्धी, आंबेराईवाडी, सोनेवाडी, गिरवले वस्ती, बर्डेवस्ती, खोसपुरी, बहिरोबा मळा, हिंगणगाव , भिस्त बाग, वडगाव गुफ्ता, पिंपळगाव माळवी, धर्म नाथगड, पिंपळगाव लांडगा, इंदिरानगर, सारोळाबद्दी, हिवरेझरे, पांढरे वस्ती, दहिगाव, गुणवडी, मांजरसुंबा, नागापुर, आठवड.

हे आहेत मानांकन मिळवण्याचे निकष
जुने रेकॉर्ड मांडणी, व्हिजीटर नोंदवही, विद्यार्थी फाईल, शाळेचे नावीन्यपूर्ण उपक्रम, वृक्षारोपण, टेबल क्लॉथ, फ्लॉवर पॉट, घोषवाक्य, ग्रामस्थांचा सहभाग, शाळेचे ठकळ नाव, सेंद्रिय गांडुळ खत, चप्पल स्टँड, अधिकारी पदाधिकारी फलक, समित्या फलक, सुविचार संदेश, खिडक्यांना पडदे, स्वच्छता व टापाटिपपणा, आपत्कालीन मार्ग, ओळखपत्र, दिशादर्शक फलक, बोलका वरांडा, आरवलेले क्रिडांगण, सौरऊर्जा वापर, वीज इनव्हर्टर सुविधा, प्रत्येक वर्गात प्रकाश योजना ट्यूब, बल्ब, फॅन, क्रीडा साहित्य मांडणी, कला कार्यानुभव, शैक्षणिक साहित्य मांडणी, विज्ञान प्रयोगशाळा, पार्किंग व्यवस्था, वीज पाणी बचत संदेश, स्वच्छता संदेश, पाण्याची सुविधा, स्वच्छ सुंदर बाह्यअंग, अंतरंग, शालेय रेकॉर्ड, राष्ट्रीय नेत्यांचे फोटो, संगणक शिक्षण, डिजीटल क्लासरुम, बागबगीचा परसबाग, रोपवाटीका, स्वागत फलक, शौचालय सुविधा, आग्नीशामक यंत्र, वाचनालय, संरक्षक भिंत, शिक्षक कार्यसूची, सूचना व कौतुक पेटी.

जिल्हा परीषद मराठी शाळेचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे. खाजगी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत . यामुळे आता चार हजार रुपये घालून शाळा आयएसओ प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. पैसे देऊन शाळा आयएसओ करणे ही बनवेगिरी आहे .
 -रामदास भोर, सभापती

आयएसओ प्रमाणपत्र नुतनीकरण तीन वर्षांनी चार हजार रुपये भरून करणे गरजेचे होते . शाळांशी संपर्क केला मात्र नुतनीकरण करण्यास कुणीही तयार झाले नाही. यामुळे या शाळांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे. प्रमाणपत्राची किंमत शून्य झाली आहे . बहुतेक शाळांत नवीन शिक्षक आले त्यानी नुतनीकरण करण्याचे मनावर घेतले नाही. आयएसओ करणार्‍या तीन ते चार कंपन्या आहेत.
-पंकज पाटील, आयएसओ अधिकारी.

Deshdoot
www.deshdoot.com