Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरमध्ये धार्मिक स्थळी आढळले 13 परप्रांतीय

नगरमध्ये धार्मिक स्थळी आढळले 13 परप्रांतीय

तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रशासनापासून माहिती लपवून ठेवत धार्मिकस्थळी अनेक परदेशी पाहुण्यांना आश्रय देण्यात आला. याच पद्धतीने नगरमधील एका धार्मिकस्थळी 13 परप्रांतीय नागरिकांना आश्रय देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व परप्रांतीय व्यक्तींना रविवारी सकाळी ताब्यात घेतले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन केले आहे. धार्मिक स्थळी आश्रय देणार्‍यांसह परप्रांतीय विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवासास बंदी आहे. तसेच, कुठल्याही धार्मिकस्थळी विनापरवाना आश्रय घेण्यासही बंदी आहे. असे असतानाही नगरमध्ये अकबरनगर भागातील एका धार्मिकस्थळी 13 परप्रांतीय नागरिकांना बेकायदेशीर आश्रय देण्यात आला. याबाबतची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे व त्यांच्या पथकाने रविवारी सकाळी अकबरनगर परिसरातील धार्मिकस्थळी असलेल्या 13 परप्रांतीय नागरिकांना ताब्यात घेतले.

त्यांना तपासणीसाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सर्वांचे घशाचे स्त्राव घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. सर्व परप्रांतीय जानेवारीमध्ये मध्य प्रदेशातील इंदौर येथून नगर शहरात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना बाहेरून कुलूप लावून आत ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनापासून माहिती लपवून ठेवत विनापरवाना आश्रय घेणार्‍या व परप्रांतीयांना आश्रय देणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या