Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्ररेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये सूट

रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये सूट

मुंबई – देशातील पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी काही मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहे. रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.

आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या शिवाय कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे. स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.

- Advertisement -

नवीन नियमावली खालीलप्रमाणे
राज्यात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सेवा बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायस मज्जाव कायम ठेवण्यात आला आहे. तसेच वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती व 10 वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे.

रेड झोन मध्ये अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने सुरू असतील, अत्यावश्यक सेवेत नसणार्‍या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार आहे. तसेच दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत काम चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर टॅक्सी, रिक्षा सेवा बंदच राहणार आहे. मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नॉन रेड झोन मध्ये स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार आहेत पण सामुहिक जमावाला बंदी घालण्यात आली आहे. आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहे. तसेच बिगर रेड झोन मधील सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच ट्रेन, मेट्रो, विमान सेवा, आंतरराज्य रस्ते वाहतूक शैक्षणिक संस्था, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या