Saturday, April 27, 2024
Homeनगर‘हम फिट तो, नगर फिट’ चा नारा देत धावले नगरकर

‘हम फिट तो, नगर फिट’ चा नारा देत धावले नगरकर

मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)– ’हम फिट तो, नगर फिट’ असा नारा देत पहाटे कडाक्याच्या थंडीत सुमारे साडेतीन हजार स्पर्धक मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये धावले. समाजाला आरोग्याप्रती व कॅन्सर विषयक जागृती करण्यासाठी नगर रायझिंग फाऊंडेशन आयोजित व महाराष्ट्र अ‍ॅथेलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

रविवार असून देखील भुईकोट किल्ल्याजवळील नगर क्लब पहाटेच गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. गुलाबी थंडीत उत्साहाची ऊब घेऊन धावणारे महिला, पुरुष, युवक-युवतींसह लहान मुले, सोनेरी सूर्यकिरणांचा वर्षाव असे मनोहारी दृष्य या मॅरेथॉन निमित्त पहायला मिळाले. अतिशय शिस्तबध्दरित्या आणि तितक्याच उत्साहात संपूर्ण मॅरेथॉन पार पडली. 21 किलो मीटर, 10 किलो मीटर तसेच 3 व 5 किलो मीटर या चार गटांत ही स्पर्धा झाली. ऑलिम्पिक खेळाडू ललीता बाबर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, रेखा सारडा, नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ.शाम तारडे, अ‍ॅड. गौरव मिरीकर, अ‍ॅथेलेटिक्सचे दिनेश भालेराव, मनपा नगर रचनाकार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून चार गटांतील मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेच्या समारोपनंतर नगर क्लबच्या मैदानावर लगेचच ऑलिम्पिक खेळाडू ललीता बाबर हिच्या हस्ते रनर्सना बक्षिस देण्यात आले. यामध्ये 21 कि.मी. पुरुष गटामध्ये प्रथम- चांगदेव लाटे (नगर), समित भूकेर (बीटीआर), कार्तिक कुमार (बीटीआर), महिला मध्ये प्रथम- स्मिता उकिर्डे, द्वितीय- भारती यादव, तृतीय- अनिता बोथरा (तिन्ही रा. नगर), तर 10 कि.मी. पुरुष गटात प्रथम- किशोर मरकड (पाथर्डी), द्वितीय- महेंद्र कुमार, तृतीय- विशाल ढगे, महिलांमध्ये प्रथम- जनाबाई हिरवे (सातारा), द्वितीय- शितल भंडारी (पारनेर), तृतीय- नेहा खान (नगर) यांनी बक्षिसे पटकाविली. सदर स्पर्धेचा अंतिम व संपूर्ण निकाल 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

यावेळी स्पर्धेतील रनर्सच्या चेस्ट नंबच्या आधारे लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये भाग्यवान विजेते ज्योतीराज शिंदे, उमेश व्यवहारे, ज्ञानेश्वर मोरे, ओम ढवळे, दिपा मोहळे, महेश घोडके, नवीन कुमार, जितेंद्र मराठे यांना सायकल बक्षिस देण्यात आले. पोलीस दल, स्वयंसेवकांची फळी आणि नगरकरांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धेतून शिस्तीचे दर्शन घडले. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या धर्तीवरील या हाफ मॅरेथॉनसाठी सर्व अत्याधुनिक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी जगदीप मक्कर, अतुल डागा, योगेश खरपुडे, गौतम जायभाय, जितेश माखीजा, संदीप कुसळकर, अमित बुरा, डॉ.महादेव रंधाळे, सुमेर सिंग, धनेश खत्ती आदींनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस दल, भारतीय लष्कर, विखे पाटील फिजिओथेरपी डिपार्टमेंट, शहरातील विविध हॉस्पिटल, एसपीजी इव्हेंट मॅनेजमेंट, युवान, हॉटेल आयरिश प्रिमीयर, नगर रायझिंग रनर्स क्लब, रेडिओ सिटी, वेलो स्कोप, टीटेन अ‍ॅप्रल, नगर क्लब, टाऊन स्क्रिप्ट, फास्ट अ‍ॅण्ड अप आदींनी सहकार्य केले. मॅरेथॉन नंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या