Tuesday, April 23, 2024
Homeनगरकेशरी कार्डधारकांना मे मध्ये मिळणार धान्य

केशरी कार्डधारकांना मे मध्ये मिळणार धान्य

प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना 8 रुपये प्रतिकिलो प्रमाणे गहू व 12 रुपये प्रती किलो प्रमाणे तांदूळ असे प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 3 लाख 32 हजार 24 एवढ्या पात्र शिधापत्रिकेमधील 14 लाख 90 हजार 17 एवढ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे वितरण मे आणि जून या महिन्यासाठी असल्याने या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकान समोर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

31 डिसेंबर, 2019 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना देय धान्याचा कोठा हा मे महिन्याकरीताचा असल्याने अशा पात्र लाभ्यार्थ्यांनी एप्रिलमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे गर्दी करु नये अथवा याबाबतच्या चौकशीसाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडे संपर्क साधू नये, या अन्न धान्यांचे 1 मे पासून वितरीत करण्यात येणार आहे.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या एपीएल (केशरी) मधील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात येत आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी अन्नधान्य वाटप करीत असताना त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजने अंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या अन्नधान्या व्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो तांदुळ मोफत वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 6 लाख 75 हजार 527 पात्र शिधापत्रिकेमधील 30 लाख 19 हजार 277 एवढ्या सदस्यांना लाभ देण्यात येणार आहे. या तांदूळाचे आजपासून वितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यासाठी 15 हजार मेट्रीक टन तांदूळाचे नियतन मंजूर झाल्याचे पुरवठा अधिकारी माळी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या