ज्येष्ठ नेते रामनाथ वाघ अनंतात विलिन
Featured

ज्येष्ठ नेते रामनाथ वाघ अनंतात विलिन

Sarvmat Digital

खा. शरद पवार यांनी घेतले अंत्यदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त अ‍ॅड. रामनाथ लक्ष्मणराव वाघ (वय 88) यांचे वृद्धापकाळाने काल बुधवारी (दि.1) रोजी निधन झाले. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी आज कै.वाघ यांचे अंत्यदर्शन घेेतले. दुपारनंतर अमरधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तसेच उदय वाघ, जयंत वाघ, डॉ. धनंजय वाघ व डॉ. सागर वाघ ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्याच्यावर नालेगाव येथील अमरधाम मध्ये अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारात वाघ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी खा.सुजय विखे, आ.सुधीर तांबे. संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, दादाभाऊ कळमकर, नंदकुमार झावरे, अनिल राठोड, जि.प अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सर्जेराव निमसे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जी.डी.खानदेशे, राजेंद्र फाळके, अभय आगरकर, सुभाष काकडे, डॉ.पारस कोठारी,बाबासाहेब भोस, भगवान फुलसौंदर, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, रामदास भोरे, अरूण कडू, पवन नाईक, गोविद मोकाटे, संभाजी कदम, अनिल शिंदे, रावसाहेब गडाख, शरद नवले, अप्पासाहेब शिंदे विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले.

अ‍ॅड. रामनाथ वाघ उर्फ अण्णा यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 साली वांबोरी येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण वांबोरी येथे झाले. मॉडर्न हायस्कुलमध्ये 1953 साली दहावी उत्तीर्ण होऊन अहमदनगर महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. 1961 मध्ये कायद्याची पदवी घेऊन विद्यापीठात दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

शालेय जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. यातूनच काँग्रेस सेवा दल, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व अध्यक्ष आदी पदे भूषविली. 1972 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. 1972 च्या दुष्काळात त्यांनी विविध योजना राबविल्या. वांबोरी येथे वसंतदादा यांच्या उपस्थितीत पाणी परिषद घेऊन 15 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणले. शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतही त्यांनी आपला ठसा उमटविला. 1958 पासून ते जिल्हा मराठा संस्थेत सक्रिय झाले. 2003 ते 2011 या काळात संस्थेच्या उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाण व्यासपीठाची स्थापना करून युग प्रवर्तक यशवंतराव यशवंत हा 700 पानांचा स्मृतिग्रंथ तयार केला.

जिल्हा मराठा संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. संस्थेत ते अण्णा नावाने परिचित होते. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व संघर्षमय स्थिती अनुभवलेल्या अण्णांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अमरधाम स्मशानभूमीत सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यापूर्वी त्यांचे पार्थिव रेसिडेन्शियल हायस्कूलच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

कै.रामनाथ वाघ यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचा जन्म हा 1 ऑगस्टला झाला होता. त्यांचे अमृत महोत्सव देखील एक तारखेला साजरा करण्यात आला होता. हाच आकडा त्यांच्या निधनाशी जोडला असल्याचे सांगत, त्यांचे सामाजिक काम देखील 1 नंबरचे होते. भाविष्यात त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी ठरेल.
– खा.शरद पवार

रामनाथ वाघ यांंनी सामजिक योगदान मोठ्या प्रमाणात दिले आहे. त्यांनी दिलेले विचार अनेकांना दिशा देणारे ठरले आहे. येणार्‍या काळात त्यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत.
– आ.संग्राम जगताप

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com