Wednesday, April 24, 2024
Homeनगरविदेश, परराज्यातील सुका मेव्याला नगरकर मुकणार !

विदेश, परराज्यातील सुका मेव्याला नगरकर मुकणार !

लॉकडाऊनमुळे यंदा रमजान उपवास अन् नमाज घरात अदा करावी लागणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शन झाल्याने आजपासून सुरूवात होत आहे. मात्र, यंदा करोना या संसर्गजन्य आजाराचे सावट असून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रथमच रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांना स्थानिक मेव्यावर भूक भागवावी लागणार आहे. तसेच प्रथमच मशिदी लॉकडाऊन असल्याने घरात रमजानची नमाज अदा करावी लागणार आहे.

- Advertisement -

देश लॉकडाऊन असल्याने ट्रान्सपोर्ट बंद आहे. त्यामुळे परराज्य, परदेशातून येणारा सुकामेवा नगर शहर आणि जिल्ह्यसात पोहचला नाही. शहरातील बाजारपेठाही बंद आहे. रमजान महिन्यांमध्ये खजूर, सुकामेवा, शेवाय व इतर पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र यंदा करोनामुळे ट्रान्सपोर्ट बंद असल्याने हा मालच नगरात पोहचला नाही. परराज्यातून खजूर, काजु, बदाम, सुकामेवा येतो. पण लॉकडाऊनमुळे खजूर देखील उपलब्ध झाला नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

नगर शहरांमधील अनेक भाग बंद असल्यामुळे मुस्लीम समाजबांधवांना रमजानची तयारी कुणालाही करता आली नाही. वास्तविक पाहता या सणाची तयारी पंधरा दिवसांपूर्वीच करावी लागते. नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर परिसर हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्जेपुरा, तेलीखुंट, भिंगार, केडगाव या भागात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

त्यामुळे ऐन तोंडावर रमजान साजरा करायचा कसा असा प्रश्न मुस्लिम समाज बांधवांसमोर आहे. मुस्लीम समाजामध्ये रमजानचा महिना पवित्र मानला जातो. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरीत झाल्याचे सांगितले जाते. रमजान महिन्याचे 30 रोजे (उपवास) ठेवणे बंधनकारक आहे. वर्षाच्या प्रत्येक ऋतूत 12 महिने येणारे हे रोजे मागील दोन वर्षांपासून उन्हाळ्यात येत आहेत. उन्हाळ्यातील रोजे हे रोजेदाराची खरी कसोटी पाहणारे ठरत असतात. कारण रोजा ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसार तब्बल 14 तास अन्नपाण्यावाचून राहावे लागते. ऋतू कोणताही असो मुस्लीम समाजातील लहान मुलांपासून आबालवृद्ध रोजे धरतात.

रमजान महिना म्हटला की, पहाटेच्या सहरपासून संध्याकाळी इफ्तारपर्यंत भाविकांच्या उत्साहाला एकच उधाण आले असते. मात्र, यावर्षी रमजानच्या महिन्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. एरव्ही रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थनांचा महिना, पवित्र महिना, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये भाविकांची गर्दी व उत्साह दिसून येत असते. मात्र यंदा संपूर्ण देशात करोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वांनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. विविध धर्माचे प्रार्थना स्थळ बंद करण्यात आले आहे त्यामुळे यंदा मुस्लिम बांधवांना घरीच नमाज अदा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या