Friday, April 26, 2024
Homeनगरविखे कुटुंबीयांनी मला चॅलेंज करू नये – राम शिंदे

विखे कुटुंबीयांनी मला चॅलेंज करू नये – राम शिंदे

पराभवाच्या अहवालात सर्व काही स्पष्ट होण्याचा व्यक्त केला विश्वास

अहमदनगर (प्रतिनिधी) – संघटनात्मक पातळीवर भाजप कमी पडलेला आहे. विधानसभा पराभवाचे कारणे शोधणारा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होईल, त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल. माझे वडील मुख्यमंत्री नव्हते, आमदार, खासदार नव्हते. यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे. जनतेने मला अनेक वेळेला निवडून दिले आहे. तसेच पक्षाने देखील योग्य न्याय दिला असून मी सर्व पदे भोगली आहेत. पक्षाचेही योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळे विखे कुटुंबीयांनी मला चॅलेंज करू नये, माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

रविवारी नगरमध्ये भाजप पदाधिकार्‍यांच्या सत्कारानंतर माजी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते. भाजप उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी थेट हल्लाबोल केला. आम्ही कर्तृत्वाने पुढे आलो आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिले. आम्हाला जनाधार होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला चॅलेंज देण्याचे काहीच कारण नाही आणि त्यांनी देऊ नये असा इशारा त्यांनी दिला. आमचा पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाने वरिष्ठ पातळीवर समिती नेमलेली आहे. ही समिती पक्षाला अहवाल देणार आहे. त्यात सर्व बाबी समोर येतीलच असे शिंदे यांनी सांगत आमच्यामध्ये कोणताही समेट नसल्याचे त्यांनी सांगितले.

नगर जिल्हा विभाजनाचा विषय मी ज्या पद्धतीने हाती घेतला, तो आगामी काळामध्ये सुद्धा सुरू राहील. जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रही राहणार आहे. आमच्या कार्यकाळात हे विभाजन होऊ शकले नाही, हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या तोंडावर सात जिल्ह्यांचे विभाजन करावे असा विषय होता. यामध्ये नाशिक, बीड, ठाणे या जिल्ह्याचा समावेश होता. निवडणुकीच्या तोंडावर जर विभाजन झाले असते, तर त्याचा वेगळा संदेश गेला असता. यामुळे तो विषय प्रलंबित राहिला. जिल्हा विभाजन झाल्यावर नगरचे मुख्यालय हे नगर तर उत्तरेचे मुख्यालय कुठे करायचे, हा राज्य शासनाचा विषय आहे. त्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे सांगत जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले.

महाआघाडीच्या सरकार स्थापन होऊन आता सव्वाशे दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही नगरला पालकमंत्री आले नाहीत. पालकमंत्री येण्यास उशीर झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक बैठका होऊ शकला नाहीत. इतर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या बैठका झाल्या आहे. जिल्ह्यातील व्यक्ती पालकमंत्रीपदी नसल्यामुळेच हा घोळ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये विकास झालाच नाही, असे केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मी केवळ पुस्तकातच नाही, तर प्रत्यक्षात विकास करून दाखवला. हा विकास करताना विरोधकांना सुद्धा मी सोबत घेतलं. माझ्या मतदारसंघात विरोधक शिल्लक राहिला नाही, म्हणूनच रोहित पवार यांनी माझा मतदारसंघ निवडला असावा, असे शिंदे म्हणाले. मी मंत्री असताना मतदारसंघात तालुक्यांमध्ये मोठा निधी आणला.

मी मंजूर केलेल्या योजनांचा आता कुटुंबच्याकुटुंब उद्घाटन करत आहे. माझा या उद्घाटनाला विरोध नाही. मात्र, कुटुंबातील व्यक्तींनी उद्घाटन करणे हे राजशिष्टाचारला धरून नाही, असा टोला आ. रोहित पवारांचे नाव न घेता त्यांनी लगावला. जिल्हा परिषदेमध्ये कोणावरही अन्याय केलेला नाही. निधीचे समान वाटप केलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. निधीला कात्री मारायची माझी प्रवृत्ती नाही. मी समान निधीचे वाटप केला, पण काहींनी त्याला विरोध केला होता. अनेक योजनांचे पैसे परत गेले, ही वस्तुस्थिती असल्याचे शिंदे सांगितले.

50 वर्षांमध्ये जो विकास झालेला नव्हता, तो मी करून दाखवला. ते त्यांना आता खपत नसेल, आरोप आ. रोहित पवार यांचे नाव न घेता शिंदे केला. केलेलस विकास जसा पुस्तिकेत आहे, तसा प्रत्यक्ष सुद्धा आहे, हे त्यांनी नीट पहावे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट करून आ. रोहित पवार यांनी दिलेले वचन आता पाळावे व विकास करावा, असेही ते म्हणाले.

थोरात यांना मिळाले अगोदरच संकेत
आपल्याला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार नाही, असे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांना मिळाले असावेत. त्यामुळे त्यांनी इतर जिल्ह्यांचे देखील पालकमंत्रिपद घेण्यास नकार दिला असावा असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. नगरची पालकमंत्री पदाची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे, त्यामुळेच थोरात यांना नगरचे पालकमंत्री पद मिळणे शक्य नव्हते, असा दावा त्यांनी केला.

माझी लढाई मोठ्या घरणासोबत होती. वास्तविक पाहता पाच ते सहा ठिकाणी रोहित पवार यांना उमेदवारीला विरोध झाला. त्यांना कुणी शिरकाव करून दिला नाही. मात्र, या ठिकाणी त्यांना स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवार कोणी मिळाला नाही, त्याचा फायदा घेऊन साम, दाम, दंड यांचा वापर केला व निवडणूक जिंकली, असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या