शिंदेंचा आक्षेप, पवारांना समन्स
Featured

शिंदेंचा आक्षेप, पवारांना समन्स

Sarvmat Digital

13 मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश । प्रामाणिकपणे निवडणूक लढलो- आ.पवार

मुंबई- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी गैरमार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे. आता न्यायालयानं या प्रकरणावर रोहित पवार यांना समन्स बजावत त्यांना 13 मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत काही आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेत शिंदे म्हणतायेत, निवडणूक काळात रोहित पवार यांनी स्वतःची मालकी असलेल्या साखर कारखान्यातल्या 100 कर्मचार्‍यांचा वापर केला. यातील काही कर्मचार्‍यांना आपण रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्‍यांच्या ताब्यात दिलं होतं असा दावाही राम शिंदेंनी सदर याचिकेत नमूद केलं असल्याची माहिती आहे. व्हॉट्स अपच्या माध्यमातून प्रचार करत मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील राम शिंदे त्यांनी या याचिकेत केला असल्याची माहिती आहे.

या याचिकेतील विशेष बाब म्हणजे सदर याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख असल्याचं वृत्त मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे.  अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.

रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.

प्रामाणिकपणे निवडणूक लढलो- आ.पवार

मी प्रामाणिकपणे निवडणूक लढलो. लोकांनी आपल्या ताब्यात ती निवडणूक घेतली होती. त्यामुळे जो निर्णय होता तो लोकांचा निर्णय होता. तरीसुद्धा भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे कोर्टात गेले. जसा त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच आमचाही आहे. मात्र, यातून काही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास मला वाटतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाहीत. लोकांच्या बोलण्यानुसार कळतंय की, राम शिंदे कोर्टात गेले आहेत.

कशासाठी गेले आहेत? त्यांनी काय मुद्दे मांडले? हे एकदा नोटीस हाती लागल्यावर समजेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेन. मात्र, सध्यातरी समन्य माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीफ, असं रोहित पवार यांनी सांगितलं विजय पराजय हे स्वीकारायचे असतात. विजयी होतात ते काम करायला सुरुवात करतात. राम शिंदेंचा पराभव झाला. ते कोर्टात गेले. ठिक आहे, त्यांचा कोर्टावर विश्वास असेल. ते त्यांची बाजू मांडतील, आम्ही आमची बाजू मांडू, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

यामध्ये राजकारण असू शकतं का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. पण लोकशाहीमध्ये लोकांचा कौल हा स्वीकारावा लागतो. त्यांना कोर्टाच्या मदतीने काही म्हणायचं असेल तर ते त्याठिकाणी मांडत राहतील. लोकांचा कौल काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

राम शिंदे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रचार करत असताना बदनामी केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पवार यांना विचारले असता, समन्स वाचल्याशिवाय या विषयावर बोलणं म्हणजे आपण अंदाज बांधून बोलतोय. न्यायालयात काय सुरु आहे हे जाणून घेत नाही तोपर्यंत याविषयी बोलू शकत नाही. न्यायव्यवस्थेचं कामं योग्य पद्धतीने सुरु असतं. त्यामुळे त्यात काय लिहिलंय हे वाचल्याशिवाय अंदाज लावत मला बोलता येणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com