काळ्या रश्शावर राज ठाकरे यांचा नगरमध्ये मनसोक्त ताव
Featured

काळ्या रश्शावर राज ठाकरे यांचा नगरमध्ये मनसोक्त ताव

Sarvmat Digital

शनिवारी दुपारची घटना : स्थानिक नेते अनभिज्ञ

अहमदनगर (प्रतिनिधी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबून काळ्या रश्शावर मनसोक्त ताव मारला. केडगाव येथील ते हॉटेल काळ्या रश्शासाठी प्रसिध्द असून या ठिकाणी ताव मारण्याची खूप दिवसांची इच्छा होती, ती पूर्ण झाल्याची भावना ठाकरे यांनी जेवणानंतर व्यक्त केली.

राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून केडगावमध्ये जेवणासाठी थांबणार असल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस फौजफौटा केडगाव उपनगरामध्ये दाखल झाला. नगर-पुणे रोडवर केडगाव या ठिकाणी असणार्‍या हॉटेलमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले.

त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर होते. नेहमीचा पांढरा शुभ्र कुर्ता आणि काळा गॉगल घालून ठाकरे केडगावमध्ये थांबले. त्यांच्यासाठी स्वंतत्र कक्षात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांनी काळ्या मसाल्याचे मटण, बाजरीची भाकरी व ताक असा आहार घेतला.

मनसेचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे यांच्या भेटीबाबत अनभिज्ञ होते. ही त्यांची जेवणासाठी खासगी भेट असल्याचे त्यांच्यासोबत असणार्‍या मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. हॉटेलमधील व्यवस्थापक सोडून त्यांनी जास्त कुणाशीही संवाद साधला नाही. खूप सुंदर जेवण असा शेरा मारीत ठाकरे यांनी केडगावचा निरोप घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com