filel photo
filel photo
Featured

… तर सीएए, एनआरसी विरोधाला जशास तसे उत्तर – राज ठाकरे

Sarvmat Digital

मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिलं आहे, मात्र हा उन्माद सुरूच राहिला तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा गर्भीत इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला.

देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने रविवारी मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन ड्राइव्ह येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.

सीएएत गैर काय असा प्रश्न विचारत राज यांनी देशात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांचा समाचार घेतला. तुम्हाला या देशात जे स्वातंत्र्य मिळालं आहे तितकं स्वातंत्र्य जगातील कुठल्याही देशात दिलं जात नाही. त्यामुळे सुखाने राहा. उगाच सगळं बरबाद करायचा विचार करू नका, असा खरमरीत सल्ला त्यांनी संबंधितांना दिला. जे प्रामाणिक मुसलमान आहेत त्यांनीही जगजागृती करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील मुस्लिम आमचाच आहे असेही ते म्हणाले.

मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात – शिवसेना
शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळं त्यांना कुणाचा तरी आधार हवा आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग मधल्या काळात त्यांनी करून पाहिला. पण तोही फसला आहे. त्यामुळं भाजप आता मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करतेय. आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटी हे त्याचंच द्योतक आहे. या बैठकांमध्येच मोर्चाच ठरलंय हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळं पाहिल्यास आजच्या मोर्चामागे भाजप असू शकते, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चांचा अर्थच लागला नाही
मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत, असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणार्‍यांना यावेळी विचारला.

Deshdoot
www.deshdoot.com