Friday, April 26, 2024
Homeनगरपुन्हा अवकाळी संकट

पुन्हा अवकाळी संकट

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहचला असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मात्र, या वातावरणात बदल होणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात विदर्भ, कोकणातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. चैत्र महिना सुरू असतानाच वैशाख वणवा जाणवू लागला आहे. कोकण, महाबळेश्वर वगळता सर्वच ठिकाणी तापमान 36 अंशांच्या पुढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत मालेगावासह, धुळे, सोलापूर, परभणी, अकोला, वर्धा येथे तापमान चाळिशीच्या पुढे होते.

- Advertisement -

यातूनच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कुलाबा वैधशाळेने दिलेल्या इशार्‍या शुक्रवारीपासून रविवारपर्यंत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. यात पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागात वादळीवार्‍यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील महिन्यांत नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला असून त्यात शेतकर्‍यांच्या गहू, कांदा पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात कोरोनाचा कहर वाढल्याने महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागाचे पंचनामे केलेले नाहीत. आता पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

यंदा मान्सून वेळेआधीच ?
वर्ष 2019 च्या मुसळधार अतीवृष्टीच्या आठवणी अद्याप ताज्या असताना आणि कुठल्याही प्रशासनाने अतीवृष्टीतील संकटांतून बाहेर येण्यासाठी अद्यापपर्यंत कसलेही नियोजन केलेले नसताना आलेल्या पावसाच्या बातमीला सावधगिरीचा इशार मानणे क्रमप्राप्त ठरणार आहे. देशात यंदा मोसमी पावसाला अनुकूल वातावरण असून सामान्य ते जादा असे प्रमाण राहू शकते. यंदा पाऊस त्याच्या निर्धारित वेळेआधी 30 मे रोजी केरळच्या किनारपट्टीच्या प्रदेशात दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या अमेरिकेच्या हवामान अंदाज वर्तवणार्‍या कंपनीने प्रसिद्ध केला आहे. स्कायमेट या कंपनीच्यावतीने प्रथम प्रसारित केलेल्या अंदाजात म्हटले आहे, एप्रिल महिन्यात तापमान 40 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. तर काही ठिकाणी हा आकडा 45 अंशाच्या आसपास राहू शकतो. यंदा आतापर्यंत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्हयात नुकतीच 45 अंशाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमनामध्ये उशीर होत असला तरी यंदा मात्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील अल निनोच्या तापमानावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अल निनोवर भारताचा मान्सून अवलंबून असतो, असे मानले जाते. तर ला नीनोचा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होत असतो. हिंदी महासागरातील जलक्षेत्र थंड राहिले तर यंदा 110 टक्के पाऊस होऊ शकतो, असे या अंदाजात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या