Friday, April 26, 2024
Homeनगरलोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदाराला सोडले मोकळे रान !

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदाराला सोडले मोकळे रान !

राहुरी-शिंगणापूर रस्ता व पुलाच्या निकृष्ट कामाकडे होतेय दुर्लक्ष

सोनई (वार्ताहर)- राहुरी-शनीशिंगणापूर 25 किलोमीटर अंतरावर विशेष बाब म्हणून 111 कोटी रुपयांचे खर्चांचा सिमेंट काँक्रीट रस्ता निकृष्ट कामामुळे प्रथमपासून गाजत असताना कौतुकी नदीवरील पुलाबाबत मोठा गाजावाजा होवूनदेखील याकडे सर्वस्तरावर दुर्लक्ष केले गेल्याने लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करुन ठेकेदाराला मोकळे रान उपलब्ध करुन दिले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, गेले 4-5 दिवस वृत्तपत्रे, सोशल मीडिया, फेसबुक इत्यादी माध्यमातून निकृष्ट कामाबाबत प्रकाशझोत पडून कुप्रसिद्धी मिळालेला हा रस्ता गाजला गेला. सोनई गावातील कौतुकी नदीवरचा पूल केवळ नदीचे पाण्याचे वाहते धारीत सिमेंट नळ्या टाकून त्यावर जेसीबी पोकलेन डंपर टिपरद्वारे मुरुमाने झाकून अवघ्या 4-5 दिवसातच ठेकेदाराने हा पूल पूर्ण केल्याचा केविलवाना देखावा करून आपले कोणीही काहीही करू शकत नाही या अविर्भावात रस्ता कामातील कृष्णकृत्य झाकण्याचा निंदनीय प्रकार केलेला असल्याचे काल समोर आलेले आहे.

111 रुपये कोटींचा विशेष निधी महामार्ग विकास केंद्रीय मंत्री नामदार नितिन गडकरी यांचेमुळे मंजूर झाला. गेल्या वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात सोनई-शनीशिंगणापूर सिमेंट रस्ता करण्यात आला. पंधरा दिवसात या रस्त्यावर तीनशेहून अधिक ठिकाणी खड्डे पडले. ठेकेदाराने हे खड्डे डांबराने बुजविले होते. पुन्हा डांबराचेही ठिगळ उखडल्यानंतर रस्ता फोडून सिमेंटचा मुलामा देण्यात आला. हा सारा प्रकार वर्तमानपत्र येऊन सुद्धा संबंधितांनी डोळेझाक केली हे विशेष. परंतु या रस्त्याचे दर्जाबाबत जाणकार मंडळी रास्त शंका घेत असताना महामार्गाचे कुठलेही अधिकारी ठोस कारवाई करायला तयार नाहीत.

सोनई कौतुकी नदी पुलाबाबत मोठा गाजावाजा होऊनही कोणाही लोकप्रतिनिधी अगर वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला ‘मोकळे रान’ उपलब्ध करून दिले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सोनईचे कौतुकी पुलाबाबद प्रसारमाध्यमात छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध होत गेल्याने ग्रामस्थ या निकृष्ट पुलाची पाहणी करण्यासाठी येत होते आणि सरळ सरळ अधिकारी व ठेकेदाराचे ‘अदृश्य हातमिळवणी’ बाबत खासगीत चर्चांना उधाण आले होते परंतु चाणाक्ष ठेकेदाराने अवघ्या 4 दिवसात नळ्या मुरूमात दडपून सर्वांचेच डोळ्यात मधूळफेक केलेली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या निकृष्ट पुलावर सध्या कडेने दुचाकी वाहने जाणेयेणे सुरू झाले असून लवकरच हा वादग्रस्त पूल मोठ्या वाहनांकरिता खुला करण्याचा प्रयत्न होत असताना गेल्या 4-5 दिवसात महामार्गाचे कुठल्याही वरिष्ठ अगर कनिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणीच केलेली नसल्याने ठेकेदाराचे फावले असून गज, सिमेंट, खडीचा काहीही वापर न करता केवळ मुरमात पूल पूर्ण करण्याचा ‘विक्रम’ पार पडला आहे. गेले 4-5 दिवस वाहनधारकांना येथे आल्यानंतर काहीही समजत नव्हते कारण नदीत नळ्या टाकताना कोणताही परावर्तित मार्ग ठेकेदाराने केलेला नव्हता. पूर्वीचे सिंगल रोडने वाहनधारकांना अतिशय ‘कसरत’ करीत यावे जावे लागत होते. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठेकेदार-अधिकार्‍यांकडून होतेय गडकरींची बदनामी
शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणारा मोठा भाविक वर्ग शनिशिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी येत असतो व दोन नॅशनल हायवे जोडण्यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्री नामदार नितिन गडकरी यांनी शनि-साईभक्ता करीता 111 कोटी रुपयांचा राहुरी शनि शिंगणापूर या 25 किलोमीटरचा महामार्ग दर्जा दिला व कुठलीही टोल आकारणी न करता केंद्र सरकारचे निधीतून ई टेन्डर मंजूर होऊन काम केले जात आहे .त्याबद्दल सर्व भाविक शेतकरी व्यापारी यांचेकडून नामदार नितीन गडकरी यांचे कौतुक केले जात आहे . मात्र काही झारीतील शुक्राचार्य व महामार्ग अधिकारी ठेकेदाराचे अभद्र युतीमुळे गडकरीं सारखे नेत्यांची चांगले कामाला ठेकेदार व अधिकारी बदनाम करू पाहत आहेत.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने कौतुकी नदीचे सुशोभिकरण केले आहे. तसेच गडाख यांचे अमृत महोत्सवानिमित्त ब्राँझ धातुची मोठी कमान त्यावर कल्पक दृष्ये, घड्याळ, मोटेचे पाणी, शेतकरी दाखविलेला आहे ही कमान उभारताना यशवंत प्रतिष्ठानने या कमानीच्या दोन्ही बाजूला दगड सिमेंट गज ओटे बांधून दर्जेदार काम केले आहे मात्र याचेच शेजारी आता ठेकेदाराने उभारलेला निकृष्ट पुल चर्चेचा विषय होत आहे. सर्व रस्त्याची वरिष्ठ चौकशी अपेक्षित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या