Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरीत क्वारंटाईनसाठी 2 हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

राहुरीत क्वारंटाईनसाठी 2 हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

702 परप्रांतीय नागरिकांचे ‘आऊटगोईंग’; तालुक्यात नियमांची पायमल्ली महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यात बाहेरून येणार्‍यांचे इनकमिंग वाढत चालले आहे. त्यामुळे तालुक्याच्या चिंतेत भर पडली असून वेगवेगळ्या गावातील विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन असणार्‍या नागरिकांची संख्या दोन हजारांपर्यंत गेली आहे. तर तालुक्यातून 702 परप्रांतीय मजूर व नागरिक आऊटगोईंग झाले आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातील सर्वाधिक तर राज्यातील 191 नागरिकांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, राहुरी तालुक्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून लॉकडाऊनच्या काळात नियमांची पायमल्ली होत आहे. त्याकडे पोलीस व महसूल प्रशासनाचे दुुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत करोनाच्या बाबतीत निरंक ठरलेल्या राहुरी तालुक्यावर या महामारीचे संकट घोंगावू लागले आहे.

चौथ्या लॉकडाऊनचा सध्या काळ सुरू असून 13 मेपासून केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे ज्या-त्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिक व मजुरांचे आऊटगोईंग व इनकमिंग सुरू झाले आहे. यामुळे शहरी भागात करोना बाधितांची वाढती संख्या पाहता ग्रामीण व निमशहरी भागाची चिंता नक्कीच वाढली आहे. त्यातही पुणे, मुंबई, ठाणे येथून आलेल्यांमुळे नागरिकांना जणू धडकीच भरली आहे .

राहुरी तालुक्यातून 13 मे ते 26 मे या काळात दहा-बारा दिवसांत बाहेरचे मजूर व नागरिक आपापल्या घराकडे बस व रेल्वेने प्रशासनाकडून रवाना करण्यात आले आहे. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशचे 281, मध्यप्रदेशचे 63, बिहारचे 65, छत्तीसगड 20, पश्चिम बंगाल 22, जम्मू व कश्मीर 18, झारखंड 13, नेपाळ दोन तर महाराष्ट्रातील विविध भागातील मजूर व नागरिक 191 अशा 702 जणांचा समावेश होता.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी राहुरी शहरासह तालुक्यात परप्रांतीय मजूर, कामगार, छोटे-मोठे व्यवसाय करणारे आपल्या गावी जाण्याच्या अपेक्षेने राहुरीतील विविध गावांत अडकून पडले होते. तालुका प्रशासनाने या नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन माहिती कळविण्यासाठी आवाहन केले होते.

याला प्रतिसाद देत मजूर व नागरिकांनी माहिती भरून दिली होती. आपापल्या गावी जाणार्‍यांची आरोग्य पथकाने वैद्यकीय तपासणी व स्थानिक प्रशासनाने बसने व रेल्वे स्टेशनपर्यंत व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. राहुरी तालुक्यात बाहेरून आलेले 94 नागरिक शासनाच्या विलगीकरण केंद्रामध्ये आहेत. याशिवाय 43 नागरिक होम क्वारंटाईन असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली.

तसेच विविध गावांतील प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे ग्राम सुरक्षा समितीने 571 नागरिकांची विलगीकरण केंद्रात राहण्याची व्यवस्था केली आहे. दहा दिवसांच्या काळासाठी क्वारंटाईन केलेल्या 1 हजार 95 नागरिक संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहेत. त्यांची व्यवस्था स्थानिक समिती पाहत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या