राहुरीचे नगराध्यक्षपद अन् आमदारकीसाठी नौटंकी आली अंगलट
Featured

राहुरीचे नगराध्यक्षपद अन् आमदारकीसाठी नौटंकी आली अंगलट

Sarvmat Digital

राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा निधी परत गेला; पाणी योजनेचा निधी अधांतरीच राहिला

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरीचे नगराध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे राजकीय भांडवल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी उपोषणाची नौटंकी केली. मात्र, अद्यापही राहुरी शहरातील ग्रामिण रुग्णालयाच्या जागेसह इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील युती शासनाच्या काळात तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे व तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकीय मेहेरेबानीने मंजूर झालेला ग्रामिण रुग्णालयाचा 16 कोटी रुपयांचा निधी जागेचा वाद चिघळल्याने परत गेला आहे. त्यातच राहुरी नगरपालिकेनेच नगराध्यक्षपदी प्राजक्त तनपुरे असताना ग्रामीण रुग्णालयासाठी ‘ना हरकत’ देण्यास टोलवाटोलवी केल्याने आता राहुरीकरांच्यादृष्टीने ग्रामीण रुग्णालय हे मृगजळ ठरणार आहे.

दरम्यान, राहुरी शहराच्या सुधारीत पाणी योजनेच्या प्रश्नावरही कर्डिलेेंना राजकीय शह देण्यासाठी आंदोलनाची नौटंकी केली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले. मात्र, प्राजक्त तनपुरे यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्नही अधांतरी असून मंजूर झालेला निधी मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब पालिकेच्याच एका अधिकार्‍याने चव्हाट्यावर आणली. त्यामुळे आता राजकीय सत्तेसाठी उपोषण आणि आंदोलनाचा फार्स करणार्‍या प्राजक्त तनपुरे यांचे राजकीय पितळ उघडे पडले असल्याची चर्चा होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचा निधीही परत गेला अन् राहुरीच्या पाणी योजनेचाही निधी अधांतरी लोंबकळल्याने प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व राहुरी मतदारसंघाला कुचकामी ठरले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायात्रेच्या निमित्ताने राहुरीत आले असताना त्यांनी तत्कालीन आ. कर्डिले यांना राहुरी शहराच्या पाणी योजनेला तत्वतः 32 कोटी रुपये मंजुरीचे पत्र दिले होते. त्यावेळी या प्रश्नाचे श्रेय घेण्यासाठी तनपुरे यांनी फडणवीस यांना पत्र दिले होते. मंजुरी मिळाल्यावर तनपुरे यांनी फ्लेक्सबाजी करून निधी मिळाल्याचा उत्सव साजरा केला.

मात्र, त्यानंतर कर्डिलेंचा पराभव करून आमदारपदी प्राजक्त तनपुरे विराजमान झाले. त्यानंतर आठ महिन्यांचा कालावधी उलटला. मंजुरी मिळविल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे फ्लेक्सही गायब झाले. तसेच निधी आणण्यावरून आरोप प्रत्यारोपही झाले. मात्र, आता या निधीचा तनपुरेंनाच विसर पडला. पाणीयोजनेचे भांडवल करून आमदारकी मिळविली. परंतु वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या निधीचे काय झाले? त्याचा तनपुरेंनी सत्ताधारी मंत्री असूनही पाठपुरावा का केला नाही? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

तर प्राजक्त तनपुरेंच्याच नाकर्तेपणामुळे राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयाबाबत अनेक वादंग निर्माण झाले. राहुरी नगरपालिकेने रुग्णालयाच्या इमारतीला कोलदांडा घातला. ना हरकत दिली नाही. सध्या ज्या जागेवर ग्रामीण रुग्णालयाची मूळ जागा अपुरी पडत असल्याने युती शासनाच्या काळात 16 कोटी रुपयांची मंजुरी मिळून तत्कालीन आ. कर्डिले यांनी स्टेशन रोडलगतची 18 एकर जागेचा प्रस्ताव दिला होता.

मात्र, तनपुरेंनी त्या जागेला खोडा घालून सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालयाचा डाव हाणून पाडला. त्यामुळे आता विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तनपुरेंच्या बालहट्टापायी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. राजकीय सत्तेची पदे पदरात पाडून घेण्यासाठी राहुरी मतदारसंघातील विकासाचा आव आणण्याचा फार्स करून तनपुरेंनी नागरिकांची दिशाभूल केली असल्याची टीका होत आहे.

राहुरी ग्रामिण रुग्णालय इमारतीसाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सुसज्ज व ट्रामा सेंटर सुविधा असलेल्या रुग्णालयाचे बांधकाम होण्यासाठी जागेचा अडसर आला. जागा अपुरी असल्याने संबंधित पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांनी त्या जागेत रुग्णालय उभे करण्यास नकार दिला. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर गेला. इतक्या अडचणींच्या चक्रव्युहातून अग्निपरीक्षा दिलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी परिणामी निधी खर्च झाला नाही. आता हा निधी परत आणण्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करून ‘बे एके बे’ चे पाढे मोजले जात आहेत. अशी माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली.

गेल्या आठ महिन्यांपासून तनपुरे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. तर राज्याचे मंत्रीही आहेत. मात्र, त्यांना राहुरी शहराच्या पाणी योजनेचा निधीचा प्रश्न आणि ग्रामीण रूग्णालयाच्या जातेचा प्रश्न मार्गी लावता आला नाही त्यामुळे राहुरीत ग्रामीण रूग्णालयाचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com