Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीत तीन पोलिसांची ‘कलेक्शन’वरून दगडाने हाणामारी

राहुरीत तीन पोलिसांची ‘कलेक्शन’वरून दगडाने हाणामारी

नगर-मनमाड महामार्गावरील भरपेठेतील घटना; पोलीस खात्याची नाचक्की

राहुरी (प्रतिनिधी)- कलेक्शनच्या वाटणीवरून राहुरी शहरातील भरपेठेत तीन पोलिसदादांमध्ये चक्क दगडाने तुफान हाणामारी झाली. शाब्दिक चकमक होऊन तिघांचेही भांडण विकोपाला गेले. तिघांनीही एकेरीवर येऊन मोठा धुडगूस घातला. हे भांडण पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी जमली. आपले ‘कलेक्शन’चे पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच तिघांनीही तेथून हळूच काढता पाय घेतला.

- Advertisement -

शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता नगर-मनमाड मार्गावर बसस्थानकाजवळ पानाच्या टपरी समोरील बाकड्यावर तीन पोलीस बसले. हिशोब सुरू झाल्यावर त्यांनी एकमेकांचे उणेदुणे काढण्यास सुरूवात केली. भांडण सुरू झाल्यानंतर तिघांचेही आवाज वाढले. भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले. भांडण विकोपाला गेले. दोघे एकमेकांना भिडले. एकट्या पडलेल्याने दगड उचलून भिरकावला. दोघांतील एकाच्या पाठीत दगड लागला. तसा तो जीवाच्या आकांताने ओरडत भोवळ आल्याने खाली बसला. हा तमाशा बघण्यासाठी लॉकडाऊन असूनही नागरिकांची तोबा गर्दी जमली. गर्दी पाहताच तिघेही ठिकाणावर आले. त्यांनी, तेथून हळूच काढता पाय घेतला.
शनिवारी या घटनेची पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तेव्हा घटनेचे बिंग बाहेर आले.

ही घटना त्यांच्या ‘साहेबां’ना समजताच त्यांनी कपाळावर हात मारून वाद नकोत म्हणून, त्यांनी पूर्वीप्रमाणेच ‘कलेक्शन’ ची जबाबदारी कायम ठेवून या भांडणावर सारवासारव करीत तात्पुरता पडदा टाकला. मात्र, भरपेठेत कलेक्शनवरून पेटलेल्या या भांडणामुळे राहुरी पोलीस खात्यात साहेबांच्याच आदेशावरून बीटनिहाय कलेक्शन जोमात असल्याचे पितळ उघडे पडले. त्या तिघांनी लॉकडाऊनमध्ये एकीकडे पोलीस खात्याचे कौतूक होत असताना राहुरी पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगल्याने आता ना. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोलीस खात्याच्या अनागोंदी कारभारात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या