राहुरीचा नगराध्यक्ष कोण ?
Featured

राहुरीचा नगराध्यक्ष कोण ?

Sarvmat Digital

नगरसेवकांमधूनच होणार निवड; अध्यादेश प्राप्त

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील निवडणूक नेमकी सर्वसाधारण मतदारांमधून होणार किंवा नगरसेवकांतून होणार याबाबत चर्चांना आता वेग आला आहे.

नगराध्यक्षपदाची निवडणूक येथून पुढे जनतेतून न होता निर्वाचित नगरसेवकांमधून होणार, हा नियम ठाकरे सरकारने आणताना भाजपा सरकारचा जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा फतवा मोडित काढला आहे.

राहुरी पालिकेत नवीन अध्यादेश येण्याच्या आत निवडणूक लागल्यास जुन्याच जनतेच्या मतदानातून निवड होणार अशी चर्चा असताना आता पालिकेला नवीन पद्धतीच्या नियमांचा अध्यादेश प्राप्त झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळून येणारा नगराध्यक्ष नगरसेवकांतूनच होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ना. तनपुरे यांचे बंधू हर्ष तनपुरे हे जनतेतून लढतील, नगराध्यक्षपदी तेच दिसत नाहीत. त्यामुळे तनपुरेंच्या वाड्याव्यतिरिक्त नेमकी कोणाची वर्णी लागते? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

दिलीप चौधरी, सौ. आहेर, सौ. साळवे, प्रकाश भुजाडी, यांना यापूर्वीच उपनगराध्यक्षपद मिळाल्याने त्यांनी या पदावर दावा करणे शक्यप्राय दिसत नाही.

या व्यतिरिक्त सूर्यकांत भुजाडी, सौ. ज्योती तनपुरे, सौ. नंदा उंडे यांची नावे चर्चेत आहेत. याउपरही हर्ष तनपुरे यांच्यासाठी सत्ताधारी मंडळाचा एखादा नगरसेवक राजीनामा देऊन त्यांना नगरसेवक केले जाऊन त्यानंतर नगराध्यक्षपदी बसविले जाण्याबाबतही चर्चा होत आहे. तसे झाले तर हर्ष तनपुरे यांच्यासाठी सत्ताधारी गटातून कोण नगरसेवक त्याग करणार? याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.

दिलीप चौधरी, अनिल कासार, नंदकुमार तनपुरे यांचीही नावे पुढे येताना दिसत आहेत. शेवटी वाड्यावरून ज्या नावाला पसंती मिळेल, त्या नावाला सर्वच नगरसेवकांची अनुमती असल्याचे चित्र आहे.

Deshdoot
www.deshdoot.com