राहुरी फॅक्टरीवरील पेट्रोल पंपाजवळ आग
Featured

राहुरी फॅक्टरीवरील पेट्रोल पंपाजवळ आग

Sarvmat Digital

कर्मचार्‍यांनीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना परिसरातील क्लब हाऊसच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात काल दि. 8 मे रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडली. मात्र, काही तरुणांसह तेथील कर्मचार्‍यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभाव्य मोठी हानी टळली.  दरम्यान, आग लागल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांनी व काही तरुणांनी देवळाली प्रवरा नगरपालिका व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. बर्‍याच वेळानंतर दोन आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.

डॉ.तनपुरे कारखान्याच्या क्लब हाऊस प्रांगण व पेट्रोल पंप पाठीमागे मोकळी जागा असून या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तिव्रतेमुळे अचानक आग लागली असल्याची शक्यता आहे.

पेट्रोल पंप व क्लब हाऊस पाठीमागे मोठ्या प्रमाणात आगीने भडका घेतला. दरम्यान कारखान्याच्या सुरक्षा विभागाचे काही कामगार सेवेत असल्याने ही घटना काही तरुणांनी त्यांना सांगितली. यावेळी कृष्णा शिवले, योगेश राऊत, प्रतीक जाधव, अनुप राऊत, शंतनू नालकर यांचे सहकार्य लाभले. डॉ. तनपुरे कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

डॉ.तनपुरे कारखान्याच्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ही आग लागली. आगीचा लोळ पेट्रोल पंपाकडे आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. डॉ.तनपुरे कारखान्याच्या क्लब हाऊस प्रांगणाच्या परिसरात सिगारेट व गांजा पिणार्‍यांची नेहमी बैठक बसते. त्यांच्याकडूनच ही आग लागल्याची शक्यता असल्याने ही आग लागल्याचे समजते. मात्र, त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कारखान्याच्या सुरक्षा विभागाकडे आहे. परंतु त्यांचा पगार मिळत नसल्याने त्यांनीही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com