पैसे भरूनही काही शेतकर्‍यांना बियाणे नाही
Featured

पैसे भरूनही काही शेतकर्‍यांना बियाणे नाही

Sarvmat Digital

राहुरी कृषी विद्यापीठातील कांदा बियाणे अवघ्या तीन तासांत संपले

राहुरी (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सोमवारी दि.08 रोजी सुरू केलेल्या ऑनलाईन कांदा बियाणे विक्रीत अवघ्या तीन तासांतच विद्यापीठाच्या बियाण्यांची विक्री झाली. सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत या तीन तासांतच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणे घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठा आटापिटा केला. मात्र, अनेक शेतकर्‍यांना पैसे भरूनही बियाणे मिळाले नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. यावेळी एकूण 4 हजार 220 किलो कांदा बियाण्याची विक्री झाली.

त्यातच कांदा बियाणे घेण्यासाठी आलेल्या अनेक शेतकर्‍यांना संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. शेतकर्‍यांकडून पैसे भरून घेतले. मात्र, बियाणे संपल्याचे सांगून शेतकर्‍यांना वाटेला लावले.  नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी सकाळी दोन तास विद्यापीठाचे संकेतस्थळ खुले झाले नाही. त्यानंतर फार्म भरून 36 तासात एनएफटी अथवा आरटीजीएसने पैसे भरण्यास सांगितले. परंतु पैसे भरल्याशिवाय फार्म सबमीट होत नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रथम पैसे भरायला सांगितले. त्यातही रोख रक्कम स्वीकारीत नव्हते.

काहींनी रोख रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा केली. विद्यापीठाने यानंतर ट्रांझेक्शन नंबर मागितला. त्यात स्टेट बँकेच्या चास (ता.नगर) येथील कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांची अडवणूक केली. तांत्रिक मुद्दा उपस्थित करून एकाच बँकेत आरटीजीएस अथवा एनएफटी होत नाही. यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाहीत. जमा स्लीपवर ट्रांझेक्शन नंबर नसल्यामुळे अडचण आली. त्या दरम्यान अनेक शेतकर्‍यांकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पैसे भरून घेतले. फार्म सबमीट करायला गेले तर विद्यापीठातील सर्व बियाणे संपले आहे, असे सांगितले. यामुळे अनेक शेतकर्‍यांची निराशा झाली. शेतकर्‍यांनी पैसे भरले, परंतु बियाणे मात्र, मिळाले नाही. आता या शेतकर्‍यांना पैसे कधी परत मिळणार? असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे. बियाणे इतक्या लवकर कसे संपले? याची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या सीड पोर्टलद्वारे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा आणि संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच कांदा बियाणे विक्री करण्यात आली. यामध्ये कांद्याच्या फुले समर्थ व बसवंत-780 या वाणांचे सुमारे 4220 किलो सत्यप्रत बियाणे विकले गेले. यामध्ये विद्यापीठाला सुमारे 63 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत हे बियाणे विकले गेले. यामध्ये पुणे- 412, औरंगाबाद-33, अहमदनगर-1208, नाशिक-2303, सोलापूर-27, जळगाव- 84, धुळे- 78, परभणी- 6, जालना- 2, भुसावळ- 10 याप्रमाणे विविध जिल्ह्यांमध्ये बियाणे विक्री झाली. यामध्ये नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बियाण्यांची खरेदी केली.

मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादन घेणार
गेल्यावर्षी विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर सुमारे 12 हेक्टरक्षेत्रावर कांदा बिजोत्पादन घेतले होते. कांदा बियाणे विक्रीसाठी प्रथमच ऑनलाईन पध्दत वापरण्यात आल्यामुळे व पहिल्या तीन तासांत सर्व बियाणे विक्री झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांना बियाणे मिळाले नाही. भविष्यात शेतकर्‍यांना बियाणे पुरविण्यात कमी पडू नये, यासाठी यावर्षी मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादन घेणार असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.

तूर, उडीद व बाजरी बियाणे खरेदीसाठी गर्दी

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर)– खरीप हंगामातील तूर, उडीद, बाजरी या पिकांच्या विविध वाणांचे प्रमाणित सत्यप्रत बियाणे राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बियाणे विक्री केंद्रावर सुरू झाल्याने बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांनी तोबा गदीॅ केली. बियाणे वाटप करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तसेच बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतकर्‍यांच्या तोंडाला मास्क न लावताच बियाणे विक्री व खरेदी झाली. विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी तोंडाला मास्क न लावताच बियाणांंची बिनधास्तपणे विक्री करीत होते.

त्यामुळे विद्यापीठाच्या बियाणे केंद्रावर लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडविले गेले. विद्यापीठ प्रशासनाने बियाणे विक्री करतेवेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही. विशेष म्हणजे सर्वसामान्य शेतकर्‍यांना लॉकडाऊनचा नियम दाखविणार्‍या विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या बियाणे विक्री केंद्रावरील आवारातच सोशल डिस्टन्सिंग न पाळता शेतकरी गदीॅ करून बसल्याचे चित्र पहावे लागले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळील बियाणे विक्री केंद्रावर शेतकर्‍यांसाठी तूर(राजेश्वर) ही 2 किलोची बॅग 220 रुपये तर बाजरी (आदिशक्ती) ही दीड किलोची बॅग 225 रुपये असा दर विद्यापीठाने निश्चित केला आहे. हे बियाणे विक्री केंद्रावर वाटप सुरू झाल्याचे समजताच बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची एकाएकी गर्दी जमल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. राहुरी तालुका करोनामुक्त असलातरी करोनाचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा गर्दीमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने विद्यापीठ प्रशासनाने गर्दी टाळणे गरजेचे होते.

दरम्यान, बियाणे वाटप सुरू करताना शेतकर्‍यांनी रांगेतून येऊन बियाणे खरेदी करावे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Deshdoot
www.deshdoot.com