Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण

राहुरी कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण

लॉकडाऊनच्या काळातही शेतीचे महत्त्व अधोरेखित- कुलगुरू डॉ.विश्वनाथा

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर)- कोव्हिड-19 या विषाणू संसर्गामुळे सध्या सगळीकडे लॉकडाऊनचे वातावरण आहे. सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी आज संकटात सापडला आहे. त्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्यामुळे त्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. परंतु या अत्यंत कठीण परिस्थितीतही काही शेतकरी व्हॉटस् अ‍ॅपसारख्या सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला माल शहरातील सोसायट्या घरपोहोच सेवा देऊन ग्राहकांपर्यंत पोहोचून विकत आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हुशारीने, कल्पकतेने आपले शेतीचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी केले.

- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत शेतकरी प्रथम प्रकल्पाच्यावतीने लॉकडाऊनच्या या काळात प्रथमच शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. विश्वनाथा बोलत होते. यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या, पुणे येथील अटारी या संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंह उपस्थित होते. यावेळी डॉ. शरद गडाख, डॉ. पंडित खर्डे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. संजय मंडकमाले, डॉ. भगवान देशमुख, डॉ. सचिन सदाफळ, डॉ.रवींद्र निमसे उपस्थित होते.

डॉ. लाखन सिंह म्हणाले, शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचून त्यातून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना याचा फायदा झाला पाहिजे. यातून शेतकर्‍यांनी स्वतःचे छोटे उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबी झाले तर या प्रकल्पाचा शेतकर्‍यांना फायदा झाला असे म्हणता येईल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यापीठाने तयार केलेले मॉडेल जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यावेळी डॉ. शरद गडाख यांनीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. उल्हास सुर्वे यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी, डॉ.संजय मंडकमाले यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी हेमंत सूर्यवंशी, ज्ञानेश्वर वाकचौरे, प्रविण पाटील या शेतकर्‍यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतमाल विक्रीबाबतचे स्वतःचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले तर आभार डॉ.सचिन सदाफळ यांनी मानले.

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी चिंचविहीरे, कनगर, मानोरी, राहुरी येथील 50 पेक्षा जास्त शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय शेडगे, किरण मगर, राहुल कोर्‍हाळे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या