हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठ ठोकता
Featured

हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठ ठोकता

Sarvmat Digital

कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे – माजी आ. राहुल जगताप 

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे, यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकर्‍यांचे भले झाले असते. त्यावेळी तोंडाला कुलूप लावले आणि आता नाहक आरोळ्या कशाला ठोकता, असा सवाल माजी आमदार राहुल जगताप यांनी केला.

श्रीगोंद्याचे राजकारण पुन्हा पाण्यावरून पेटायला सुरूवात झाली आहे. नगर आणि पुणे यातील वाद यामुळे पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. आ. पाचपुते यांनी कुकडीच्या आवर्तनावरून अधिकार्‍यांना दोषी धरले, त्याला माजी आ. जगतात यांनी पत्रक काढून उत्तर दिले आहे. जगताप म्हणाले, कुकडीचे रोटेशन सुरू झाल्यानंतर 132 नंबर वितरिकेचे आवर्तन सुरू होणे गरजेचे असताना तसे झाले नाही. 132 ला उशिरा रोटेशन सुटल्याने सर्व शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही. त्याचवेळी चुकीच्या नियोजनामुळे नको तेथे पाण्याचा गैरवापर झाल्याने कोणत्याही पाझर तलावात पाणी सोडले नाही.

विसापूरचे आवर्तन सुरू करून महिन्याचा कालावधी उलटला, तरी विसापूर तलावात कुकडीतून खाली जाणारे थेंबभर पाणीही सोडले नाही. पहिल्याच पाण्यातून विसापूरचे आवर्तन केल्याने पुढील आवर्तन विसापूर तलावातून करणार कसे? घोडेगाव, भावडी, पारगाव, वडाळी, लेंडी नाला या पाझर तलावांमध्येही पाणी सोडले नाही. रोटेशन चालू असताना सर्वांना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले नाही. आता सहानुभूतीसाठी पुणेकरांशी खडाजंगी केल्याचे नाटक पाचपुते करत आहेत.

जगताप यांनी म्हटले की, मी पण विरोधी पक्षाचा आमदार होतो. त्यावेळी अशी नाटकबाजी केली नाही. शेजारचे पालकमंत्री असताना त्यांना विश्वासात घेऊन अधिकार्‍यांना हाताशी धरून पाण्याचे नियोजन करून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला. आज तर पाण्याची परिस्थिती चांगली असताना शेतीला पाणी देता येत नसेल, तर याला जबाबदार कोण? जर काही चांगले झाले तर माझ्यामुळे झाले, आणि वाईट झाले तर दुसर्‍यामुळे झाले ही वृत्ती पाचपुते यांनी सोडून द्यावी. झालेल्या नुकसानीची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी असे माजी आ. राहुल जगताप यांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com