राहाता तालुक्यातील 41 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

राहाता तालुक्यातील 41 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

32 व्यक्ती विलगीकरण कक्षात तर 9 होम क्वारंटाईन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हनुमंतगाव व हसनापूर या गावातील 41 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 32 व्यक्तींना राहाता तालुक्यातील निघोज येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 9 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये एकूण 56 व्यक्ती दाखल करण्यात आल्या आहेत.

विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हनुमंतगाव व हसनापूर संबधित गावाच्या परिसरात गृहभेटीद्वारे 100 टक्के तपासणी करुन नागरिकांकडून आवश्यक असलेल्या माहितीचे संकलन करण्यात येत आहे. गावांमध्ये जंतूनाशक द्रवाची फवारणी करण्यात येत आहे.

स्वस्त धान्य दुकानातून मासिक नियतन नियमित देण्यात येत असून अंत्योदय तसेच प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. वैद्यकीय औषधे, जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची वाहतूक सुरळीतपणे होत असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासनाने कटेंनमेंटक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये 13 पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तपासणीचे कार्य करत आहेत.
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने पथकाला तपासणीसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मीडियातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com