राहाता पालिका सर्व समित्या विखे गटाकडे
Featured

राहाता पालिका सर्व समित्या विखे गटाकडे

Sarvmat Digital

पिपाडा गटाला धक्का

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता पालिकेतील चारही विषय समित्या विखे गटाच्या ताब्यात आल्या असून डॉ. राजेंद्र पिपाडा गटाला एकही समिती राखता आली नाही. बांधकाम सभापती भीमराज निकाळे, स्वच्छता व आरोग्य सभापती सलीम शहा, पाणीपुरवठा सभापती सुरेखा मेहेत्रे, महिला बालकल्याण मनीषा बोठे यांची बिनविरोध निवड झाली.

राहाता नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी विशेष सभा घेण्यात आली. दुपारी एक वाजता चारही समिती सभापती पदासाठी विखे गटाच्या चार सदस्यांनी अर्ज दाखल केले. दुसर्‍या गटाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्व सभापतींची निवड बिनविरोध पार पडली.

बांधकाम समिती- सभापती भीमराज निकाळे सदस्य- विजय सदाफळ, सागर लुटे, विमल आरणे, निलम सोळंकी यांची निवड झाली.
स्वच्छता व आरोग्य समिती- सभापती सलीम शहा, सदस्यपदी सविता सदाफळ, निलम सोळंकी, विमल आरणे यांची निवड झाली.

पाणी पुरवठा समिती- सभापती सुरेखा सचिन मेहेत्रे तर सदस्यपदी हरी मारूती पवार, विमल आरणे, निलम सोळंकी.

महिला बालकल्याण समिती– सभापती मनीषा सुनील बोठे तर सदस्यपदी ममता पिपाडा, विमल आरणे, अनराधा तुपे.

नियोजन व विकास समिती- सभापती राजेंद्र पठारे, सदस्यपदी विमल आरणे, डॉ. राजेंद्र पिपाडा, साहेबराव निधाने, विजय सदाफळ यांची निवड करण्यात आली.

राहाता पालिकेची विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. सर्व समित्या विखे गटाच्या ताब्यात आल्या असून नगराध्यक्ष पिपाडा गटाला एकही समिती राखता आली नाही. पालिकेत पिपाडा गटाबरोबर दोन सदस्य राहिले तर भाजपाचे पाच सदस्य पिपाडा गटापासून दूर गेल्याने संख्याबळ न राहिल्याने त्या गटाने अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे सर्व समित्या विखे गटाच्या ताब्यात गेल्या.

विखे-पिपाडांची बैठक होऊनही तोडगा निघाला नाही
समिती सभापती निवडी अगोदर राजेंद्र पिपाडा यांनी आमदार विखे यांच्यासोबत विखे गटाच्या नगरसेवकांची बैठक घेतली व दोन समित्यांची मागणी केली. मात्र विखे गटाच्या सदस्यांनी त्याला जोरदार विरोध केल्याने पिपाडांना या समिती निवडीतून माघार घ्यावी लागली. भाजपच्या सदस्यांना या निवडीतून बाजूला ठेवल्याने त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

गटनेत्यांनी पदाचा गैरवापर केला
भाजपाच्या पालिकेतील गटनेत्या ममता पिपाडा यांनी गटनेता पदाचा अधिकाराचा गैरवापर करून निष्ठावान सदस्यांना विषय समिती सदस्य निवडीपासून दूर ठेवल्यानेच या सर्व समित्या विखे गटाच्या ताब्यात गेल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक सचिन गाडेकर यांनी पाच सदस्यांच्यावतीने केला. हा भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय असून याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे या सदस्यांनी सांगीतले.

Deshdoot
www.deshdoot.com