राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे कंटेन्मेंट क्षेत्र घोषित

राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे कंटेन्मेंट क्षेत्र घोषित

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथे करोना रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात, निमगाव कोर्‍हाळे येथील अण्णाभाऊ साठे नगर, क्रांती चौक, वेसजवळील गावठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळील वस्ती, एकलव्य नगर, इंदिरा वसाहत, कातोरी वस्ती, साईनाथ हाऊसिंग सोसायटी, चांगदेवनगर, सुलाखेनगर, यमुनानगर, विजयानगर, देशमुख चारीखालील भाग, रेस्ट हाऊस/हेलीपॅड रोडपासून उत्तर बाजू कंटेन्मेंट क्षेत्र आणि सर्व निघोज गावठाण बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दिनांक 30 मे 2020 रोजीच्या दुपारी 2-00 वाजेपासून दिनांक 12 जून 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम, 1897 लागू करून खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्यांना प्राप्त अधिकारानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे हा आदेश उद्घोषित करण्यात यावा. कंट्रोल रुम स्थापन करून 24 बाय 7 कार्यरत ठेवावी. त्याठिकाणी 3 ते 4 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येऊन प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत.

कंट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरिकांना आवश्यक त्या जिवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणार्‍या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणार्‍या बाबी जसे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारून शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करून, पथके तयार करून खरेदी व विक्री, वाहतूक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे.

या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करून एकच रस्ता मुव्हेबल बॅरिकेट्सद्वारे खुला ठेवावा. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणार्‍या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधित संनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. प्रतिबंधीत भागामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. सदर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी, शिर्डी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून करोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बध घालणे शक्य होईल.कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com