राहात्यातील कंटेन्मेंट झोन अजूनही सील नाही

बाहेरील क्षेत्रातील इतर दुकाने सक्तीने बंद; व्यापार्‍यांची नाराजी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीत चालणार्‍या जुगाराच्या क्लबमुळे करोना झाल्याची चर्चा असून सर्वच पत्ते खेळणारे क्वारंटाईन करण्यात आले तर काही अद्यापही पसार झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पालिका प्रशासनाने 24 तासांनंतरही कंटेन्मेंट झोन पूर्ण सील न करता त्याबाहेरील शहरातील दुकाने बंद केल्याने अनेक व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी शहरातील बोठे गल्लीतील एकजण करोनाबाधित सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. पालिकेने तातडीने ज्या परीसरातील तो रुग्ण सापडला त्याच्या कुटुंबातील व्यक्ती व त्याचा सहवासात आलेले एकूण 31 जणांना क्वारंटाईन केले आहे . मात्र अजूनही अनेकजण पसार झाले असून त्यांचा शोध लागत नाही. मंगळवारी दुपारी सदर रुग्णाचा अहवाल येताच पालिकेने तातडीने संपूर्ण शहर बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र काल दुसर्‍या दिवशी चोवीस तास उलटल्यानंतरही पालिकेने कंटेन्मेंट झोन सिल न केल्याने या भागातील नागरिक मुक्तपणे शहरात हिंडत होते.

तर पालिका प्रशासन या क्षेत्राबाहेरील भागातील दुकाने बंद करून धन्यता मानत होती. या भागाची पाहणी केली असता ज्या भागात हा रुग्ण आढळला तेथे रस्ता बंद करण्यासाठी बांबूचे बॅरिकेट करण्यात आले. मात्र त्यातून नागरिकांचा मुक्तपणे संचार सुरू दिसून येत होता. कोठेही पक्की बँरिकेटींग न करता शहरातील अनेक रस्ते मोकळेच दिसून आले. त्यामुळे या संचारबंदीचे तीनतेरा वाजले असून केवळ मुख्य रस्त्यावरील दर्शनी भागातील व्यापारी दुकाने बंद करून पालिका प्रशासन देखावा करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील मध्य वस्तीत राजरोसपणे पत्त्याचा क्लब सुरू होता. 40-50 जणांचा येथे वावर दिसत असताना संचारबंदी काळात पोलीस व पालिका प्रशासन काय करत होते? असा सवाल नागरिक विचारत आहेत. क्लब चालकच करोनाबाधीत निघाल्याने येथे जुगार खेळण्यासाठी येणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. यातील काहींनी स्वतः होऊन क्वारंटाईन झाले तर काहीजण पसार झाले आहेत. आरोग्य विभाग व पालिका कर्मचार्‍यांकडून घरोघर जाऊन आरोग्य तपासणी व माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. पलिकेने या प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व रस्ते तातडीने सिल करून येथील नागरीकांची ये-जा बंद करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *