‘महसूल’च्या तत्परतेने पुणतांबेकर अचंबित
Featured

‘महसूल’च्या तत्परतेने पुणतांबेकर अचंबित

Sarvmat Digital

बेकायदा वाळू उपशाकडे मात्र कानाडोळा

पुणतांबा (वार्ताहर)- राहाता तालुक्याच्या महसूल विभाग काही बाबतीत किती जागरूक आणि कर्तव्य तत्पर आहे याचा धक्कादायक अनुभव बुधवारी रात्री एका घटनेवरून पुणतांबा ग्रामस्थांना आला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ अंचबित झाले आहेत. मात्र अशी तत्परता गोदावरी नदीपात्रातून होणार्‍या बेकायदा वाळूच्या उपशाबाबत दाखविली जात नाही.

पुणतांबा येथील डेरानाला भागात पाणलोट क्षेत्र विकास योजनेअंर्तगत शेतकरी वर्गाने स्वतःच्या जामिनी देऊन दहा हजार लोकवर्गणी भरून 2016 मध्ये चरांचे रुंदीकरण खोलीकरण केले. या कामाची दखल घेऊन माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे डेरानाला भागात बखळे वस्तीसमोर एक तसेच त्याच्या उत्तरेला अंदाजे 300 मीटर अंतरावर एक असे दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. पाटपाणी व पावसाचे पाणी अडवून बंधारे भरल्यावर त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे. शेतकरी या बंधार्‍याची देखभालही करतात.

बुधवारी 4 वाजेच्या दरम्यान लगतच्या एका शेतकर्‍याने नातेवाईकाचा ट्रॅक्टर बोलावून व पाहुण्यांचे जेसीबी आणून चरातून घरासमोर टाकण्यासाठी मुरुम खोदाईचे काम सुरु केले. अशी खबर राहात्याच्या महसूल विभागाला मिळाली आणि रात्री आठ वाजेच्या दरम्यान महसूल विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. लगेच शेतकरी व जेसीबीवाल्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. मुरुम खोदण्यासाठी परमिट हवे ही विभागाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अधिकारी आल्याचे समजताच लगतच्या शेतकर्‍यांनी गर्दी केली. त्यानंतर त्यांनी चूक झाली अशी याचना केली अखेर हमीपत्र घेऊन प्रकरणावर पडदा पडला. मात्र ही चर्चा चालू असतांना एका शेतकर्‍यांने पुणतांबा येथील नदीपात्रातून आजही लॉकडाऊन असतांना मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळुचा उपसा करुन राहाता शिर्डीकडे रात्री वाहतूक केली जाते. शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखविलेली जागरूकता तिकडेही दाखवा, अशी विनंती केली. या प्रश्नामुळे अधिकारी चांगलेच हिरमुसले व निघून गेले.

येथील कामगार, तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पोलीस यंत्रणा असतांना बेकायदा वाळूचा उपसा सर्रास सुरू आहे. तेथे महसूल विभागाने कारवाई करण्याची तत्परता दाखविली तर भविष्यात पुणतांब्याचे वाळवंट तरी होणार नाही अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. बेकायदा वाळूच्या उपशाबाबत काय कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com