Friday, April 26, 2024
Homeनगरपुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गासाठी अजितदादांचा पुढाकार

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गासाठी अजितदादांचा पुढाकार

संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक ः खा. अमोल कोल्हे

पुणे-  21 वर्षांपासून प्रशासकीय प्रक्रियेत असलेल्या पुणे-संगमनेर-नाशिक सेमी स्पीड मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्यानंतर या मार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खा. अमोल कोल्हे यांनी दिली.

- Advertisement -

या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देईल. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असेही खा.कोल्हे यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचे पवार यांच्या कार्यालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले. हा रेल्व मार्ग पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असून या मार्गाशी संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः घेणार आहेत. यावेळी सविस्तर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जंबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड, असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या वाट्याचे 3 हजार 208 कोटी रुपये आगामी पाच वर्षांत उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून 2024 पूर्वी ही रेल्वे धावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संगमनेर, अकोलेतून जाणार्‍या या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या रेल्वेमार्गाशी साईबाबांचे शिर्डी तीर्थस्थळही जोडणे भविष्यात शक्य होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या