Thursday, April 25, 2024
Homeनगररविवारपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

रविवारपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

4 लाख 41 हजार 115 बालकांना पाजणार डोस

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहीम रविवार 19 जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये शून्य ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागात 3 लाख 74 हजार 150, शहरी भागात 2 हजार 87 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 46 हजार 878 असे जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 41 हजार 115 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या लसीकरणासाठी 5 लाख 62 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे वाटप सर्व आरोग्य संस्थांना करण्यात आलेले आहे. 19 जानेवारी रोजी ग्रामीण भागात 2 हजार 770 बुथ, शहरी भागात 75 व महानगरपालिका क्षेत्रात 181 असे जिल्ह्यामध्ये 3 हजार 26 बुथवर 7 हजार 843 कर्मचार्‍यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. 1995 पासून आजतागायत आतापर्यंत अनेकवेळा पल्स पोलिओ लसीकरण मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून 13 जानेवारी 2011 नंतर भारतामध्ये एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही.

सातत्याने 5 वर्षे एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. भारताला पोलिओ मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 19 जानेवारी 2020 रोजी राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथिल सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हास्तरावर एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवर काम करणार्‍या आरोग्य सेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका व कार्यक्रमात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घेण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल समितीची सभा नुकतीच झाली. यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी संबंधित विभागाकडील उपविभागीय अधिकारी, नगर पालिकांचे मुख्यधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना मोहिमेमध्ये भाग घेण्याबाबत कळविले आहे.

ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. प्रकाश लाळगे यांनी केले आहे.

20 जानेवारी रोजी तांत्रिक खंड घेऊन ग्रामीण भागात 21 जानेवारीपासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात 101 ट्रांझिट टीमव्दारे बस स्टँड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व 136 मोबाईल टीमव्दारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणार्‍या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या