Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतकरी संघटनेचे आजपासून ‘फोन डाऊन’ आंदोलन

शेतकरी संघटनेचे आजपासून ‘फोन डाऊन’ आंदोलन

अनिल घनवट : आजपासून मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांना फोन, मेसेज

श्रीगोंदा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांकडे असणारा सर्व प्रतिचा कापूस सरकारने सरकट खरेदी करावा, यासाठी शेतकरी संघटनेने केलेली मागणी पुर्णत: मान्य न झाल्यामुळे आजपासून (दि.30) मंत्री व लोकप्रतिनिधींचे फोन डाऊन करण्याचे आंदोलन होणार असल्याची घोषणा शेतकरी सघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी त्वरित सुरु करुन फक्त एफएक्यू प्रतीचा कापूस खरेदी न करता सर्व कापूस खरेदी करावा, त्यासाठी आणखी एक किंवा दोन ग्रेडमध्ये कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकरी संघटनेने, मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांकडे केली होती. प्रत्येक खरेदी केंद्रावर फक्त 20 गाड्या कापूस स्वीकारण्याची अट रद्द करावी. व्यापार्‍यांना विकलेल्या कापसाची उर्वरीत रक्कम भावांतर योजना सुरु करुन शेतकर्‍यांना द्यावी, आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.

शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार सरकारने दररोज 20 गाड्यांची मर्यादा रद्द केली असली, तरी ग्रेड वाढवणे व भावांतर योजनेबाबत निर्णय न केल्याने शेतकरी संघटनेने जाहीर केलेले कापूस कैफियत आंदोलन आजपासून सुरु होणार आहे. कापूस हे विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाचे पिक आहे. शासनाने शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी न केल्यास उत्पादकांवर मोठे संकट येणार आहे. सध्या तापणार्‍या उन्हामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या आत पावसाळा सुरु होणार आहेय त्या आगोदर कापूस खरेदी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

असे होईल आंदोलन
आज (दि. 30) सकाळी आठपासून शेतकरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्र्यासह सर्व मंत्री, खासदार, आमदारांना फोन करुन, एसएमएस संदेश, व्हॉटस्अपवर संदेश पाठवून कैफियत मांडतील. शेतकरी संघटनेच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील. करोनाचे संकट असताना रस्त्यावरचे आंदोलन शक्य नसल्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या घरी बसूनच हे आंदोलन करायचे आहे. संघटनेचा पुढील आदेश येईपर्यंत आंदोलन सुरु राहील. शेतकर्‍यांनी सभ्य भाषेत लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा. संघटनेच्या शिस्तीचे दर्शन घडवून द्यावे, असे आवाहन घनवट यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या