Saturday, April 27, 2024
Homeनगरअखेर ‘त्या’ प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

अखेर ‘त्या’ प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बेलापूर येथील महाविद्यालयात 12 वीची पूर्वपरीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीच्या अंगाला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरून, बाबूराव कर्णे या प्राध्यापकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विद्यार्थिनी बेलापूर महाविद्यालयात इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेते. शनिवारी जीवशास्राचा पेपर होता. या वर्गावर प्रा. बाबूराव कर्णे हे पर्यवेक्षण करीत होते. संबंधित विद्यार्थीनीच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थीनीची पर्यवेक्षक कर्णे यांनी कॉपी पकडली व तिला बेंचवरून उठवून देऊन आणखी कॉपी आहे काय? हे पाहण्याच्या बहाण्याने त्या विद्यार्थिनीच्या शेजारी बसून अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

- Advertisement -

याप्रकरणी संबंधित पीडित विद्यार्थिनीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाबूराव पांडुरंग कर्णे या प्राध्यापकाविरुद्ध विनयभंग तसेच अनुसूचित जातिजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करीत आहेत.

दरम्यान, हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी बुधवारी सकाळी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून सदर प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत कोणालाही पाठीशी घालणार नाही असे, आश्वासन संस्थेकडून देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपत मुथा, सचिव शरद सोमाणी, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, उपसरपंच रवींद्र खटोड, भरत साळुंके, देविदास देसाई, प्रशांत शहाणे, प्रफुल्ल डावरे, गोपाल जोशी, मनोज श्रीगोड, जावेद शेख, भास्कर बंगाळ, विष्णुपंत डावरे, प्रकाश कुर्‍हे, अशोक गवते आदींसह मोठ्या संख्येने अन्य नागरिक उपस्थित होते.

या ठिय्या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी बेलापूर पोलीस चौकीकडे आपला मोर्चा वळविला. तेथे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी चर्चा करून संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली.

तरुणांनी गुरुवारी महाविद्यालय व गाव बंदचा इशारा दिला होता. मात्र, गावाला वेठीस न धरता, संबंधित प्राध्यापकावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तर पोलीस निरीक्षक बहिरट यांनीही तक्रार आल्यास पुढील कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनतर बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थ तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध संघटनांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. या सर्व घडामोंडीनंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान प्रा. कर्णे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथे एक पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.

प्राध्यापकावर कारवाई करा – त्रिभुवन
बेलापूर महाविद्यालयात झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा रिपाइंच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्या प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे. अन्यथा जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या