Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रवरासंगमला अडकले पायी प्रवास करणारे दीडशे कामगार

प्रवरासंगमला अडकले पायी प्रवास करणारे दीडशे कामगार

विदर्भ-मराठवाड्यातील 103 कामगारांनी निवडला शेवगाव रस्त्याचा पर्याय

47 परप्रांतीय कामगार अजुनही अडकलेले

- Advertisement -

देवगडफाटा (वार्ताहर)- पुणे येथे कामाला असलेले व रोजगारच बंद झाल्याने विदर्भ-मराठवाड्यासह मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातील आपल्या गावाकडे निघालेले दिडशे कामगार नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर प्रवरासंगम येथे अडकून पडले. पायी जात असलेल्या या कामगारांचा मार्ग सिमा सिल करून औरंगाबाद पोलिसांनी रोखला असल्याने या कामगारांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी विदर्भ-मराठवाड्यातील 103 कामगार शेवगाव मार्गाचा पर्याय निवडून त्या मार्गाने मार्गस्थ झाले. उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातील 47 कामगार मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अडकलेलेच होते.

प्रवरासंगम येथे अडकून पडलेले हे कामगार बुलढाणा, परभणी या जिल्ह्यातील तर काही मध्यप्रदेशातील आहेत. राज्यात संचारबंदी लागू असताना घरी जाण्यासाठी या कामगारांना कोणतेही वाहन मिळत नसल्याने पुणे येथून हे कामगार मजल दर मजल करत आपले घर जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुणे-औरंगाबाद महामार्गाने दोनशे किलोमीटर पायपीट करत हे मजूर दि. 20 एप्रिल रोजी प्रवरासंगम येथे पोहचले. याठिकाणी नगर जिल्ह्याची सीमा संपून औरंगाबाद जिल्हा सुरू होतो.

गोदावरी नदीच्या पुलावर अलीकडे व पलिकडे सीमा सील केलेल्या आहेत. मात्र पोलिसांच्या कडेकोट पहार्‍यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातील काही कामगारांनी सांगितले की औरंगाबाद पोलीस दोन दिवसांपासून पुढे जाऊ देत नसल्याने आम्हाला दोन दिवसांपासून एका मंगल कार्यालयात थांबवण्यात आले आहे.

पोलिसांनी आदेशानुसार त्यांना थांबवले असले तरी त्यांचा व्याकुळ चेहरा घरी जाण्याची आस आणि ओढ लागलेली दाखवत आहे. कधी झाडाचा आसरा सहारा घेत तर कधी थोडासा विसावा घेऊन हे कामगार पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. घरी जाण्यासाठी त्यातल्या काहींना अजून पाचशे, काहींना तीनशे तर काहींना दोनशे किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे. हलाखीची परिस्थिती आणि हातचे काम बंद झाल्याने आणि कोरोना रोगाच्या दहशतीने या मजुरांनी हतबल होऊन आपल्या गावचा रस्ता धरला आहे. हातचे काम बंद झाल्याने परत जाण्यासाठी त्यांना खूप यातना सहन कराव्या लागत आहेत. दिवसभर चालायचे आणि रात्री मिळेल तिथे निवारा पाहून उपाशीपोटी झोपायचे अशा गंभीर अडचणींचा सामना या मजुरांना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी अन्नदाते अन्न देत असल्याचे यावेळी बोलताना कामगारांनी सांगितले.

दि.21 रोजी सकाळी पोलीस पुढे जाऊ देत नसल्याने या मजुरांनी संगम मंगल कार्यालय येथे उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. महसूल विभागाने त्याच्या जेवणाची सोय केली पण त्यांनी ते जेवण घेतले नाही व आम्हाला पुढे जाऊ दिले नाहीतर आम्ही येथेच उपोषण करू अशी भूमिका घेतली. या घटनेची माहिती मिळताच नेवाशाचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी या ठिकाणी जाऊन सर्व कामगाराची समजूत काढली व काहीतरी मार्ग काढू असे सांगितल्यावर उपोषण न करण्याचे तहसीलदार यांना आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांना जेवण देण्यात आले

याप्रसंगी सर्व कामगारांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. एस. ए. पवार, डॉ. चोरमले, सिस्टर श्रीमती ससाणे, आरोग्य सेवक डॉ. आर. एस. चोरमले यांनी मशीनद्वारे थर्मल स्कॅनिंग करून गरजूंना औषधोपचार करण्यात आले.

कामगारांनी नाकारले जेवण
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जिल्हा सीमा सिल केल्याने सोमवारपासून विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेश व उत्तप्रदेशातील पायी प्रवास करत निघालेले दिडशे कामगार प्रवरासंगममध्ये अडकले. मंगळवारी सकाळी दिलेले जेवण घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर तहसीलदार रुपेश सुराणा यांनी समजावल्यानंतर त्यांनी जेवण घेतले. दुपारी त्यापैकी विदर्भ व मराठवाड्यातील 103 कामगार शेवगावमार्गे पायी रवाना झाले. मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशमधील 47 कामगार मात्र तेथेच थांबले. मंगळवारी सायंकाळी या कामगारांसाठी सोनईहून जेवण आले. मात्र त्यांनी ते नाकारले. आम्हाला जेवण नको रस्त्याने जाऊ द्या असे त्यांचे म्हणणे होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या