साधेपणातून जनसंपर्काचा ‘गडाख पॅटर्न’
Featured

साधेपणातून जनसंपर्काचा ‘गडाख पॅटर्न’

Sarvmat Digital

नेवासा (तालुका वार्ताहर) – राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागूनही तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख यांनी त्यांचा साधेपणाचा गुण कायम राखल्याचे दिसून आले आहे. तालुक्यात आल्यानंतर त्यांनी मंत्र्यांच्या मागेपुढे असलेला लवाजमा व डामडौल टाळून विविध गावांचा दौरा करून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत ग्रामस्थांना सुखद धक्का दिला आहे.

एरवी मंत्री म्हटले की, त्यांच्या मागेपुढे पोलीस, शासकीय अधिकार्‍यांच्या गाड्यांचा लवाजमा, डामडौल डोळ्यासमोर येतो. सर्वसामान्य नागरिकांना मंत्र्यांना भेटण्यासाठी हे सर्व दिव्य पार पाडावेच लागते. साधेपणाविषयी ते सर्वत्र परिचित आहेतच. हा साधेपणा त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही कायम राखला याचा सुखद धक्का तालुकावासीयांना नुकताच बसला आहे.

मंत्रालयातील जबाबदारी पार पाडून तालुक्यात आल्यानंतर ना. गडाख यांनी गुरुवारी सोनईत विविध वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन त्यांना लोकांच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या. शुक्रवार आणि शनिवारी त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांची गार्‍हाणी ऐकली. यादरम्यान त्यांनी वर्षश्राद्ध, लग्न समारंभांनाही हजेरी लावली. यावेळी त्यांच्याभोवताली कुठलाही लवाजमा व गोतावळा नसल्याने लोकांना त्यांच्याशी अगदी जवळून संवाद साधता आला. साधेपणातून जनसंपर्काच्या या अनोख्या पॅटर्नची तालुक्यात सर्वत्र चांगलीच चर्चा झडल्याचे दिसून आले.

पाण्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा
नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांसाठी पाण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत त्यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आदेश दिला असून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही चर्चा केली आहे त्याप्रमाणे सोमवारी कालवा सल्लागार समितीची नगर येथे बैठक घेण्यात येणार आहेत.

आमदार म्हणण्याचा आग्रह
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असताना जनतेकडून त्यांना नामदार साहेब असे अनेक ठिकाणी बोलले जात असताना मला आमदारच म्हणा अशी विनंती गडाख जनतेला करत असल्याचे दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com