नगर – खाकीतील माणुसकीचा लालटाकी झोपडपट्टीतील विधावांना आधार

नगर – खाकीतील माणुसकीचा लालटाकी झोपडपट्टीतील विधावांना आधार

अहमदनगर (प्रतिनिधी) – समोर साहेबांची गाडी… त्यामागे कमांडोच्या ड्रेसमधील पोलीस… पाठोपाठ मालवाहतूक टेप्पो. लालटाकीच्या भारस्कर कॉलनीच्या गेटवर थांबले अन् काय घडले या शंकेने नागरिक भयभीत झाले. मात्र हाच पोलीस फाटा जेव्हा विधावांच्या घरात धान्य व गरजेच्या वस्तू घेऊन पोहचला तेव्हा डोळ्यांच्या कडा पाणवत खाकीतील माणुसकीचे दर्शन त्या विधवांन झाले. आज मंगळवारी सकाळीच धान्य, दाळ, तेल, मीठ-मिरची, साखर-चहापावडरचे पॅकिंग घेऊन कमांडोच्या वेशातील पोलीस त्या शंभर महिलांच्या घरात पोहचले. एरव्ही पोलीस फक्त कारवाईसाठीच या झोपडपट्टीत शिरतात असा आजवरचा त्यांचा अनुभव. आज मात्र खाकीतील पोलिसांची माणुसकीही त्यांनी अनुभवली. खाकीत दडलेला माणूस पाहून त्या विधवांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या. या कॉलनीतील शंभर विधवा महिलांना पोलीस प्रशासनाने मदत केली.

झोपडपट्टीतील विधवा महिला धुणी-भांडीचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देश लॉक डाऊन असल्याने त्यांच्या हातचे काम गेले. बहुतांश घरमालकांनी कामवाली बाईला महिनाभर यायचे नाही असे सांगत पगार देणेही बंद केले. त्यामुळे या महिलांची रोजीरोटीच बंद झाली. अन्न नसल्याने चुल बंद होण्याच्या मार्गावर आली. ही बाब नगर शहराचे डीवायएसपी संदीप मिटके यांना कळाली. त्यांनी कॉलनीतील विधवा महिलांची माहिती कलेक्ट केली. शंभर महिलांची नावे त्यांना मिळाली. सामाजिक संघटनांची मदत घेत पोलिसांनी या प्रत्येक विधवा महिलांच्या घरात अत्यावश्यक वस्तू पोहच केल्या आहे.

बंदोबस्तावरील खाकीचे नेटवर्क

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पुढाकारातून शहरात उपासमारी होत असलेल्या अनेक घटकांतील कुटुंबांना मदतीचा हात दिला जात आहे. मिटके यांनी त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे नेटवर्क उभे केले आहे. कोणत्या भागात कोण उपाशी अन् कशाची गरज आहे, याची माहिती मिटके यांच्यापर्यंत खाकीतील माणुसकीमार्फत पोहचविली जाते. मदतीचा हात पुढे करत आलेल्या संघटनांशी संपर्क करत मिटके हे थेट मदत पोहच करत असल्याचे समजले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com