Friday, April 26, 2024
Homeनगरपतसंस्थेची बदनामी थांबविण्यासाठी 25 लाखांच्या खंडणीची मागणी

पतसंस्थेची बदनामी थांबविण्यासाठी 25 लाखांच्या खंडणीची मागणी

साकूर येथील कर्जदाराविरूध्द गुन्हा दाखल

सोनेवाडी (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील एका नामांकित पतसंस्थेच्या विरोधात खोट्यानाट्या तक्रारी करून पतसंस्थेची व व्यवस्थापनाची बदनामी थांबविण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पतसंस्थेचे वसुली क्लर्क रवींद्र गिरजा भालेराव यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून साकुरीतील कर्जदार बाबासाहेब बळवंत बनसोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीत म्हटले आहे की, कर्जदार बाबासाहेब बनसोडे यांनी पतसंस्थेकडून 55 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.कर्जाची वेळेत परतफेड न केल्यामुळे पतसंस्थेने तगादा लावण्यास सुरुवात केली. पतसंस्थेने रीतसर कोर्टात वसुलीचा दावा दाखल केला. कोर्टाने 2 हजार 500 रुपये प्रमाणे हप्ता भरण्याचे आदेश दिले. तरीदेखील बनसोडेने त्यास दाद दिली नाही. मग पतसंस्थेने वसुली व विक्री अधिकारी मारुती लक्ष्मण निंभोरे यांच्यामार्फत नोटिसा बजावून कर्जदार यांची साकुरी येथील मिळकत कायदेशीररित्या जप्त केली.

त्याचा राग मनात धरून बनसोडे याने जिल्हाधिकारी व अप्पर अधिकारी नाशिक यांच्याकडे वेळोवेळी अपील केले. ते अपीलही फेटाळण्यात आले. पतसंस्थेने जप्त केलेली मिळकत विक्री करण्यासाठी एका दैनिकात जाहीर नोटीस दिली. त्याचा राग मनात धरून बनसोडे याने संस्थेबद्दल लेखी तक्रारी करण्यास सुरुवात केली.

संस्थेच्या कोपरगाव शाखेच्या इमारती बद्दलही व संस्थेच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दलही त्याने विविध ठिकाणी खोट्यानाट्या तक्रारी करून त्रास देण्याचे काम केले. संस्थेच्या विरोधात अनेक तक्रारी करूनही संस्थेने आपली वसुलीची रीतसर कार्यवाही चालू ठेवली. फिर्यादी रवींद्र भालेराव हे कर्जवसुलीसाठी साकुरी येथे बनसोडे यांच्या घरी गेले असता बनसोडे यांनी विरभद्र मंदिर राहाता समोरील व्यापारी संकुला जवळ भालेराव यांना बोलावून घेतले. भालेराव यांनी बनसोडे यांना कर्जाच्या वसुलीचा तगादा केला व तुम्ही करत असलेल्या संस्थेच्या विरोधातील खोट्यानाट्या तक्रारी मागे घ्या. तक्रारीचे षडयंत्र थांबवा.

तुम्ही करत असलेल्या खोट्या तक्रारीमुळे व्यवस्थापनाला व संस्थेला याचा खूप मोठा त्रास होत आहे. तुम्हाला घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा सूट दिली जाईल असे त्यांनी बनसोडे यांना सांगितले. यावर बनसोडे यांनी मी पतसंस्था व व्यवस्थापनाच्या विरोधात खोटेनाट्या तक्रारी करणार नाही व त्यांना त्रास देणार नाही त्या बदल्यात मला 25 लाख रुपये द्या अशी मागणी केली. मात्र मला 25 लाख रुपये मिळाले नाहीतर मी पतसंस्था व व्यवस्थापकीय प्रमुखांच्या विरोधात अजून खोट्यानाट्या तक्रारी करून त्यांची बदनामी करेल अशी धमकी दिली.

2 फेब्रुवारी रोजी देखील कर्जवसूली संदर्भात माझ्याबरोबर असलेली विक्री वसुली अधिकारी मारुती निंभोरे यांना फोन करून मी तक्रारी मागे घेतो त्या बदल्यात 35 लाख रुपये द्या अशी मागणी केली शेवटी तडजोड करत 25 लाख रुपयांच्या रकमेची खंडणी मागितली. खंडणी मागितल्याप्रकरणी रवी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब बनसोडे यांच्याविरुद्ध राहाता पोलीस स्टेशन मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या