आम्ही जातो आमुच्या गावा !

आम्ही जातो आमुच्या गावा !

नगरमधून 1225 मजुरांना घेऊन रेल्वे लखनौकडे मार्गस्थ । भोपाळचे मजूर देखील जाणार । तालुक्यातून बसने नगरला आले

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासन केली आहे. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी सहा वाजता नगर-लखनौ (उन्नाव) ही रेल्वेगाडी 1 हजार 225 प्रवाशांना घेऊन उत्तरप्रदेशकडे मार्गस्थ झाली. त्याच गुरूवारी रात्री दहा वाजता मध्यप्रदेशातील मजुरांना घेऊन नगर-भोपाळ ही रेल्वे ही विशेष गाडी पाठविण्यात आली.

जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 623 परराज्यातील मजूर, विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. यात सर्वांधिक लोक उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थान राज्यातील आहेत. तालुका प्रशासन या मजुरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे त्यांची नोंद पाठविली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून संबंधित राज्याला ही माहिती कळवून मजुरांना पाठवण्याबाबत परवानगी घेतली आहे. मिळालेल्या परवानगी नूसार 1 हजारच्यावर प्रवाशी असतील तर रेल्वेने त्यांची जाण्याची सोय केली जात आहे.

बुधवारी शिर्डीतील मजूर घेऊन पहिली रेल्वेगाडी उत्तरप्रदेशला रवाना झाली. त्यानंतर काल गुरूवारी नगर रेल्वेस्थानकातून नगर-लखनौ या गाडीचे नियोजन करण्यात आली. सायंकाळी सहाची वेळ गाडीसाठी देण्यात आली होती. नगर, पारनेर, राहुरी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा अशा विविध तालुक्यात असलेल्या या प्रवाशांना संबंधित तहसीलदारांनी नगर रेल्वेस्थानकात बसने आणण्याची व्यवस्था केली. दुपारपासूनच हे प्रवाशी जमण्यास सुरूवात झाली. स्थानकात या प्रवाशांना सामाजिक अंतर पाळून उभे करण्यात आले.

तसेच रेल्वेगाडी आल्यानंतरही सर्वांना पुरेशे अंतर ठेवून गाडीत बसवण्यात आले. तत्पूर्वी सर्व प्रवाशांना जेवण, पाणी, मास्क, सॅनिटाईझर मोफत देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली. सायंकाळी सहाच्या दरम्यान ही रेल्वे लखनौकडे रवाना झाली.

नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पारनेरचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील, पारनेरच्या तहसीलदार स्वाती देवरे, सामान्य प्रशासन शाखेच्या तहसीलदार वैशाली आव्हाड, तसेच रेल्वे, पोलीस व महसूलचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लखनौसाठी 590 रूपये तिकीट
उत्तरप्रदेशातील लखनौकडे मजुरांना घेऊन गेलेल्या या रेल्वेचे शुल्क 590 रूपये होते. ज्या त्या तालुका प्रशासनाने रेल्वेस्थानकात पोहोचण्याआधीच हे पैसे मजुरांकडून गोळा करून त्यांना तिकिटाची व्यवस्था करून दिली. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे सोपे गेले आणि गोंंधळ झाला नाही.

परराज्यात जाणार्‍यांची नोंदणी
बिहार 1729, उत्तर प्रदेश 5434, मध्य प्रदेश 2817, राजस्थान 823, झारखंड 512, छत्तीसगढ 481, गोवा 10, गुजराथ 70, कर्नाटक 171, दिल्ली 7, महाराष्ट्र (अन्य जिल्ह्यात) 6757, नेपाल 29, ओरीसा 110, पंजाब 41, तामीळनाडू 18, तेलंगाणा 24, पश्चिम बंगाल 429, आंध्रप्रदेश 34,उत्तराखंड 25, आसाम 25, हरियाणा आणि दमन प्रत्येकी 5, केरल 4, जम्मू काशिमीर 62 आणि हिमाचल प्रदेश 3 यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आले 174
आतापर्यंत परराज्यात अडकलेले 174 जण नगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यात राजस्थानातून आलेले 143, पंजाबमधून 15, तर उत्तरप्रदेशमधून 16 जण आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून नगर जिल्ह्यात येण्यासाठी 626 जणांनी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली असून ती परवानगी देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com