Thursday, April 25, 2024
Homeनगरत्या परप्रांतियांनी घराकडे जाण्यासाठी शोधला नवा फंडा

त्या परप्रांतियांनी घराकडे जाण्यासाठी शोधला नवा फंडा

सायकलवर निघाले प्रवासाला; मात्र बाजाठाण शिवेला झाले लॉकडाऊन

टाकळीभान (वार्ताहर)- करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याठी गेल्या दिड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक परप्रांतीय मजूर जागोजागी अडकून पडले आहेत. घर गाठण्यासाठी कोणी पायपीट करीत घरच्या वाटेवर आहेत. मात्र राहाता तालुक्यातील काही मजुरांनी वेगळाच फंडा शोधून घरचा रस्ता धरला मात्र नागरिकांच्या जागरुकतेमुळे ते रस्त्यातच लॉकडाऊन झाले आहेत.

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील काही मजूर कोल्हार येथील एका खाजगी कागद कारखान्यात कामाला होते. गेल्या दिड महिन्यापासून करोनाच्या पार्शभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने या मजुरांच्या हाताचे काम गेले होते. कारखानदाराने या मजुरांची काही दिवस व्यवस्था ठेवली मात्र लॉकडाऊन कालावधी वाढल्याने कारखाना मालकाने या कामगारांकडे दुर्लक्ष केल्याने उपासमार सुरु झाल्याची प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केली.

घराकडे जाण्यासाठी वेगळा फंडा या कामगारांनी वापरला आहे. त्यासाठी त्यांनी 34 नव्या कोर्‍या सायकली खरेदी केल्या आहेत. काल गुरुवारी भल्या सकाळी हे 34 कामगार कोल्हार येथून गोरखपुरला जाण्यासाठी निघाले होते. कोल्हार, बेलापूर, टाकळीभान, बेलपिंपळगाव, घोगरगाव, कमालपूर, बाजाठाण मार्गे ते औरंगाबच्या दिशेने प्रवास करणार होते. मात्र भल्या सकाळी या सायकलींचा ताफा अनेकांनी पाहिल्याने सर्वत्र चर्चा झाली. शेवटी कमालपूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर बंधार्‍यावरील पुल ओलांडून त्यांनी मराठवाड्यात प्रवेश केला.

पैलतिरावरील बाजाठाण या गावाच्या दिशेने जात असताना तेथील दक्ष पोलीस पाटील विजय सुकदेव भराडी यांनी या 34 सायकल स्वारांना अडविले व चौकशी केली असता त्यांनी सर्व माहिती दिली. भराडी यांनी माणुसकीच्या भावनेने त्यांच्या जेवणाचा बंदोबस्त केला. त्या कामगारांची समजुत घालून करोना विषयी जनजागृती केली. विरगाव (वैजापूर) पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.

स.पो.नि.विश्वास पाटील यांनी फौजफाट्यसह धाव घेत त्या सर्व परप्रांतीय कामगारांशी चर्चा केली. कोल्हार येथील ज्या कंपनीत हे कर्मचारी काम करीत होते त्या कंपनीच्या मालकाशी व व्यवस्थापकाशी चर्चा करुन त्या परप्रांतीय कामगारांची जबाबदारी कंपनीची असल्याने त्यांचा सांभाळ कंपनीनेच करावा, असे आवाहन केले. कंपनी व्यवस्थापनानेही पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला व शेवटी त्या 34 परप्रांतीय कामगारांना पुन्हा कोल्हारच्या दिशेने पाठविण्यात आले. पो.पा. विजय भराडी यांनी दाखवलेल्या चाणाक्षपणामुळे उपासमार होत असलेल्या परप्रांतीय कामगारांना निवारा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या