अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे यांचे अपघाती निधन
Featured

अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे यांचे अपघाती निधन

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय संभाजी बोर्‍हाडे (वय 55, रा. केळी-ओतूर) यांचे काल बुधवारी नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना निधन झाले. केळी ओतूर येथे राहत्या घरी विहिरीचे काम चालू असताना 17 मे रोजी ते विहिरीत काम पाहण्यासाठी उतरले होते. यावेळी विहिरीतून बाहेर येताना वायर रोप तुटल्याने ते विहिरीत कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना संगमनेर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हात, पाय, पोट व कंबरेला जखमा झाल्या होत्या.

त्यामुळे तातडीने नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर फुप्फुसावर शस्रक्रियाही करण्यात आली. परंतु उपचारा दरम्यान काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नाशिकला धाव घेतली. अत्यंत शांत, संयमी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर तालुक्यात शोककळा पसरली. भाजपकडून सातेवाडी पंचायत समिती गणातून ते निवडून आले होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी बोर्‍हाडेे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com