Friday, April 26, 2024
Homeनगरपंचायत समिती आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

पंचायत समिती आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

टाकळीभानच्या जि.प. सदस्या संगीता गांगुर्डे यांची याचिका ; सरकारला नोटीस

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- टाकळीभान गटातील जिल्हा परिषद सदस्या संगीता बन्सी गांगुर्डे यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारास आरक्षण न मिळाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. याबाबत गुरुवार दि.26 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवल्याने नगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे आरक्षण न्यायीक कचाट्यात सापडले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीची आरक्षण सोडत दि. 12 डिसेंबर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर झाली होती. अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जामखेड पंचायत समितीसाठी निघाले होते. मात्र तेथे या प्रवर्गातील सदस्यच नसल्याने या प्रवर्गातील सदस्य सभापती होण्यापासून वंचीत राहणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम-1962 सभापती, उपसभापती निवड नियम क्र.2 (फ) प्रमाणे पंचायत समिती आरक्षण आवर्तन पद्धतीने होणे आवश्यक आहे. ते होत असताना पूर्वी आरक्षित असलेल्या पंचायत समितीस वगळून लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण निश्चिती होणे क्रमप्राप्त आहे.

आरक्षण काढताना या नियमांची पायमल्ली झाली असल्याचे अ‍ॅड.अजित काळे यांनी उच्च न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण जाहीर केले जाते. यापूर्वी असे आरक्षण जर पडलेले असेल तर ती पंचायत समिती वगळून अन्यत्र उतरत्या क्रमाने ते आरक्षण लागू करण्याचा नियम आहे.

ज्या पंचायत समितीस आरक्षण लागू होते ती वगळून ते आरक्षण अन्यत्र लागू करण्यात येते. मागील वेळी कर्जत पंचायत समितीस आरक्षण लागू होते मात्र तेथे उमेदवारच नसल्याने तेथील आरक्षण रद्द करण्यात आले होते. तेथे अनुसूचित जमातीला आरक्षण अद्याप मिळालेच नसल्याची माहिती आहे. तीच बाब जामखेड बाबत असल्याने याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत राज्याच्या ग्रामविकास सचिवांना 13 डिसेंबर रोजी विचारणा करून मार्गदर्शन मागितले होते.

त्या अनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जिल्हा परिषद सदस्या संगीता बन्सी गांगुर्डे यांनी अनुसूचित जमातीला आरक्षण मिळाले नसल्याची याचिका (क्रं.40440/2019) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. ती काल न्यायालयासमोर सुनावणीस आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी राज्य शासनास नोटीस बजावून सदरची याचिका येत्या गुरुवार दि.26 डिसेंबर रोजी सुनावणीस ठेवली असल्याचे संगीता गांगुर्डे यांचे वकील अ‍ॅड. अजित काळे यांनी सांगितले.

याचिकाकर्त्या संगीता गांगुर्डे या श्रीरामपूर पंचायत समितीचे विद्यमान सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे व जि.प सदस्य शरद नवले गटाच्या समर्थक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या