आगीच्या संकटकाळात पालिकेचे अग्निशामक नादुरुस्त !

एकाच वाहनावर कर्मचार्‍यांना करावी लागते कसरत !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील निमगाव खैरी व रामगड येथे काल दुपारच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या. मात्र नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत एकाच अग्निशामक वाहनाच्या साहाय्याने वेळेत दोन्ही ठिकाणी पोहचून आग आटोक्यात आणली.

दरम्यान, नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या दोन अग्निशामक वाहनांपैकी एका वाहनाचा ग्रेअर बॉक्स अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने हे वाहन नादुरुस्त असून दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनास ‘मुहूर्त’ मिळालेला नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशामक वाहन दुरुस्त होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास निमगाव खैरी येथील कुदळे या शेतकर्‍याच्या गाईच्या गोठ्या शेजारील लाकडांना आग लागली. याबाबत त्यांनी पालिकेस कळवून अग्निशामक दलास बोलाविले. त्यानुसार पालिकेचे अग्निशामक दल निमगाव खैरी येथे दाखल होऊन तेथील आग आटोक्यात आणली. ही आग विझेपर्यंत रामगड येथे दुपारी 2 वाजता भुसार मालास आग लागल्याची खबर मिळाली. मात्र अग्निशामक बंब निमगाव खैरी येथे गेल्याने तातडीने रामगड येथे अग्निशामक दल पाठविणे शक्य नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली.

दरम्यान, याच अग्निशामक बंबाच्या चालकास रामगड येथील घटनेची माहिती दिल्यानंतर या बंबाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ श्रीरामपुरातील दशमेशनगर येथील बोअरिंगवर पाणी भरुन हा बंब रामगडच्या दिशेने रवाना झाला. तोपर्यंत रामगड येथील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचवेळी अग्निशामक घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

यामध्ये मकासह इतर भुसार माल जळाल्याने नुकसान झाले आहे. मात्र सतर्कता दाखवत वेळेत दोन्ही ठिकाणच्या आग आटोक्यात आल्याने रामगड येथील नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांचे आभार मानले. श्रीरामपूर नगरपालिका अग्नीशामक विभागाचे चालक मनोज शर्मा तसेच कर्मचारी विजय बागडे व अनुज झरेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणच्या आग आटोक्यात आल्याने या कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.

पालिकेला होईना ‘गेअर बॉक्स’ दुरूस्त !
आगीसारख्या घटना रोखण्यासाठी नगरपालिकेकडे 2 अग्निशामक वाहने उपलब्ध आहे. मात्र यातील एक वाहन ‘लॉकडाऊन’ च्या अगोदर अनेक महिन्यांपासून गेअर बॉक्स अभावी नादुरूस्त आहे. मात्र तरी देखील वाहन दुरुस्त करण्याबाबत अद्यापही पालिका प्रशासनाने तसदी घेतलेली नाही. त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या श्रीरामपूर शहराचा विचार करता सुरक्षा तसेच भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्याच्यादृष्टीने तरी अग्निशामक वाहन दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *