बीजमाता पोपेरे, झहीरखान पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’
Featured

बीजमाता पोपेरे, झहीरखान पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’

Sarvmat Digital

नवी दिल्ली – विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातील 118 नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले. यात नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे, आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी असणारे तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झहीरखान यांच्यासह राज्यातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. निरक्षर असूनही राहीबाईंनी अकोले तालुक्यातील आदिवासी भागात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैविक बियाण्यांची बँक चालवत असल्यामुळे त्या बीजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाण्यांचे जतन केले आहे.

पोपेरे यांना यापूर्वी महिला व बालकल्याण विभाग भारत सरकारतर्फे नारी शक्ती 2018 पुरस्कार राष्ट्पती रामनाथ कोविंद यांचे हस्ते प्रदान झालेला आहे. बीबीसीने 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. बायफ या संस्थेच्या मदतीने गावरान व देशी बियाणे संवर्धन करतांना त्यांनी आपल्या राहत्या छोट्याश्या घरात बियाणे बँक चालू केली. आजूबाजूच्या आदिवासी गावातील महिलांना बायफच्या मदतीने एकत्र करून बचत गटांच्या माध्यमाने गावरान, देशी बियाणे संवर्धन व प्रचार, प्रसार केला. त्यांनी अथक प्रयत्नातून 53 पिकांचे 118 वाण जतन केले आहेत.

या वाणांचा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला उपयोग होण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे. महिला मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रे, अभ्यास सहली, मार्गदर्शन शिबिरे या माध्यमातून त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असूनही त्यांनी गावरान बियाणे संवर्धन व प्रसार यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला. शनिवारी दुपारी त्यांना दिल्ली येथून फोन आला. पुरस्कारासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. यानंतर सायंकाळी प्रसार माध्यमांना यासंदर्भात वृत्त प्रसारित होताच त्यांच्या कोंभाळणे गावासह तालुका व जिल्ह्याला आनंद झाला. त्यांच्या या गौरवाबद्दल अकोले तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्या पाठोपाठ कोंभाळणे गावाला हा दुसरा सन्मान मिळाला. यामुळे अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना सामाजिक कार्याबद्दल (पाणी) पदमश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पवार यांचे कार्य देशभरात परिचित असून पाणी व्यवस्थापन, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, कूपनलिकाबंदी, व्यसनमुक्ती या त्यांच्या ऊल्लेखनीय कार्यामुळे ते देशातच नव्हे तर जगभरात परिचित आहेत. केरळमधील कोची येथे नुकत्याच झालेल्या पाच देशांच्या बिक्स कार्यशाळेत पवार यांनी लोकसहभागातून विकासाचे सूत्र मांडले. त्यांच्या भूमिकेबद्दल कार्यशाळेला उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी गौरव केला. पवार हे महाराष्ट्रातील आदर्शगाव योजना कार्य समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून राज्यातील 100 गावे आदर्शवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल म्हणून ब्रिक्स कार्यशाळेत राज्य सरकारने त्यांना राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. गावपातळीवरील पर्यावरण रक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व अन्य जबाबदारीची जाणीव स्थानिक रहिवाशांसह देशभरात त्यांनी रुजविली. 26 जानेवारी 1990 साली झालेल्या आपल्या पहिल्याच ग्रामसभेत त्यांनी सर्व लोकांना सहकार्यासाठी आवाहन केले. पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, शेतीसाठी पाणी, शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, रस्ते, वीज, नोकरी-धंदा, सोशल, कल्चरल ऑक्टिव्हिटीज आदी मुद्याच्या आधारे 1990 ते 1995 या पाच वर्षांसाठी योजना तयार केली.

गावात पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या. जलसंधारणाचे नियोजन करून गावात पहिले पाणी आणले. डोंगरावरून आलेले पाणी, चर खणून जमिनीत जिरवण्याची व्यवस्था केली. याबरोबरच स्त्रियांसाठी बचत गटाची स्थापना, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, दूध डेअरीची सोसायटी, भजनी मंडळ आदी उपक्रम राबविले. यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झाले. तसेच गावाची अर्थव्यवस्था सुधारली. दरम्यान पदमश्री पुरस्काराने गौरव झाल्यामुळे हिवरे बाजारसह अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
मूळचे श्रीरामपूरचे भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज म्हणून आपली कामगिरी बजाविणारे क्रिकेटपटू झहीर खान यांना देखील पद्श्रमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील 11 मानकरी
महाराष्ट्रातील एकूण 11 नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी, सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर आदींचा समावेश आहे.

लोकसहभागाचे महत्त्व हे जनतेला पटवून देण्यासाठी आमच्या गावकर्‍यांनी गेल्या तीस वर्षापासून एकत्रितपणे येऊन पाणी आडवा पाणी जिरवा यांच्यासह, विविध उपक्रम हाती घेतले व याला प्रशासकीय जोड सुद्धा मिळत गेली. इतरांचे सुद्धा सहकार्य मिळाले. हा पुरस्कार गावकर्‍यांचा सन्मान वाढविणारा आहे.
– पोपटराव पवार, हिवरेबाजार.

माझे नाव मोठे व्हावे हा उद्देश ठेवून कधीच काम केले नाही. समाजाचे भले व्हावे हाच माझा उद्देश राहिला. यापुढेही देशातील सर्वसामान्यांपर्यंत गावरान बियाण्यांचे महत्व पोहचविण्याचे काम करीत राहीन. स्वत:ला मोठे समजत नाही. पुरस्कारातून समाजाला जो आनंद होतोय, तोच माझा आनंद.
-राहिबाई पोपेरे

पद्मविभूषण सन्मानाचे मानकरी
दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, दिवंगत अरुण जेटली, दिवंगत सुषमा स्वराज, दिवंगत विश्वेशतीर्थ स्वामी श्री पेजावर अधोखजा मठ उडुपी, अनिरुद्ध जुगनौथ जीसीएसके, छन्नुलाल मिश्रा, मेरी कोम.

पद्मभूषण सन्मानाचे मानकरी
एम. मुमताज अली, सय्यद मुआझ्झीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. सेरिंग लँडोल, आनंद महिंद्रा, नीलकांत मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), जगदीश शेठ, पी. व्ही. सिंधू, वेणू श्रीनिवासन.

Deshdoot
www.deshdoot.com