पाचेगावात तलाठ्यांनी सील केलेली दुकाने 24 तासांत खुली
Featured

पाचेगावात तलाठ्यांनी सील केलेली दुकाने 24 तासांत खुली

Sarvmat Digital

करोना ग्रामसमिती व ग्रामपंचायत प्रशासनातील मतभेद चव्हाट्यावर

पाचेगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यात करोनाची लागण झालेली व्यक्ती सापडली म्हणून गावात महसूल खात्याचे कामगार तलाठी गणेश जाधव यांनी गावातील सायंकाळी पाच नंतर चालणार्‍या दुकानांवर कायदेशीर कारवाई म्हणून दुकाने सील करण्यात आली होती. गावात पूर्णपणे लॉकडाऊन नाही. गावातील किराणा दुकानांसह इतर दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय गावातील प्रशासनाने घेतला आहे. पण गावातील काही दुकाने सायंकाळी पाचनंतर देखील सुरू ठेवण्यात येतात, असा आरोप इतर काही दुकानदारांनी केला.

त्या अनुषंगाने कामगार तलाठी गणेश जाधव यांनी पाचनंतर चालणारी दुकाने सील करून पाच हजार दंड आकारण्यात येईल असे दुकानदारांना सांगण्यात आले व कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सकाळी ग्रामपंचायत मध्ये कारवाई केलेले दुकानदार व स्थानिक प्रशासनामध्ये चर्चा झाली. चर्चेत ठरवण्यात आले की, दुकानदार यांच्याकडून रुपये पाचशे घेऊन दुकाने उघडी करून देण्यात यावीत. त्या दुकानदारांनकडून पाचशे रुपये घेण्यात आले. स्थानिक प्रशासनाने तलाठी यांना सांगून त्या दुकानदारांचा कारवाई अंतर्गत दंड मागे देण्याचे सांगून ती दुकाने पूर्ववत चालू करावी,असे सांगण्यात आले.

स्थानिक प्रशासनाने सांगितल्याने कामगार तलाठी यांनी दंडाची रक्कम परत करून त्या दुकानाचे सील तोडून दुकाने चालू करण्यात आली व त्या दुकानदारांना समज देण्यात आली. पण या सर्व गोष्टीमुळे ग्रामपंचायत प्रशासन एकप्रकारे स्थानिक राजकारणातून दुकानदारांची मनधरणी करताना दिसत होते. यामुळे कायदा पाळणार्‍या बाकीच्या दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या व्यक्तींना दहा दिवस गावातील शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे पण ग्रामपंचायतमधील काही जण क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना कमी कालावधीत सोडून देण्यासाठी दबाव तंत्राचा अवलंब केला जातोय, असे शासकीय कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यामुळे ग्रामसमिती आणि ग्रामपंचायत प्रशासन यांचे मतभेद चव्हाट्यावर आल्याचे तरी सध्या दिसत आहे.

गावात आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे. पण पाचेगावात भरपूर प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा फिजिकल डिस्टन्स पाळण्यात येत नाही. अनावश्यक नागरिक गर्दी करताना दिसत आहेत करोना पाचेगावच्या जवळपास येऊन ठेपला असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना स्थानिक पातळीवर दिसत नाही. तलाठी यांनी केलेल्या कारवाईचे गावात एकप्रकारे स्वागत करण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पाचेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी आतापर्यंत योग्य निर्णय घेऊन गावातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केलेले आहे. पण गावात यावरून राजकारण सुरू असल्याने करोनाच्या कामात अनंत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सरकार नियुक्त ग्रामसमितीवर गावातील अनेक व्यक्ती दबाव आणू पाहत आहेत. या सर्व गोष्टीमुळे ग्रामसमितीच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
– संगीता कांबळे, सरपंच पाचेगाव

मी जिल्हाधिकारी आणि नेवासा तहसीलदार यांच्या आदेशानुसार कारवाई करीत आहे. त्यांच्या आदेशानुसार कारवाई करताना मला पाचेगावात अनेक अडचणी येत आहेत. कारवाई केलेल्या व्यक्ती व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामध्ये राजकीय चर्चा होऊन दुकानांना दंड न आकारता चालू करण्याबाबत सांगण्यात आले आहे. ग्रामसमिती नुसतीच कागदावर आहे का? असा समज निर्माण झाला आहे.
– गणेश जाधव, कामगार तलाठी,पाचेगाव

Deshdoot
www.deshdoot.com