पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्यात आग
Featured

पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्यात आग

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेल्या साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि. या साखर कारखान्यात काही भागाला सोमवारी दि.17 रोजी सायंकाळी आग लागली. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, रात्री उशिरापर्यंत फायर ब्रिगेडची वाहने आग विझवत होते. नक्की नुकसानीचा आकडा अधिकृतपणे समजला नाही.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील मालकीचा असलेला साईकृपा कारखाना हिरडगाव फाटा येथे आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला नसला तरी अन्य कामे कारखान्यात सुरू होती. सोमवारी दुपारी चारच्या सुमाराला कारखान्याच्या काही भागाला आग लागली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने अग्निशामक यंत्रणा बोलावण्यात आली. उशीरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. नक्की नुकसान किती झाले याबाबतीत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. कारखान्यात को-जनरेशन वीजनिर्मिती सुरू असल्याने आगीमध्ये नेमके कशाचे आणि किती नुकसान झाले, हे पंचनामा झाल्यानंतर समजू शकणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com