Wednesday, April 24, 2024
Homeनगरनेवाशात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

नेवाशात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

नेवासा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे दालन व घरासमोर कचरा टाकून आंदोलन

नेवासा (शहर प्रतिनिधी)- नेवासा नगरपंचायतमधील विशेष सभेत मंजूर कामावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. नंतर सत्ताधारी त्यांच्याच प्रभागातील कामे मंजूर करत असल्याचा आरोप करत भाजप व मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग करत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या दालनात तसेच नगराध्यक्षा यांच्या घरासमोर कचरा टाकत आंदोलन केले.

- Advertisement -

काल नगरपंचायतच्या सभागृहात नगराध्यक्षा निवडीनंतर झालेल्या पहिल्याच विशेष सभेत सत्ताधारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे बहुमत असल्याने सत्ताधार्‍यांनी त्यांच्याच प्रभागातील कामांचे ठराव मंजूर करून निधी त्यांच्या प्रभागात वळविला असल्याचा आरोप करत भाजप व मित्र पक्षाच्या विरोधी नगरसेवकांनी सभात्याग करत निषेध नोंदवला. नंतर मागील आठवड्यापासून शहर स्वच्छतेचा ठेका संपल्याने व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे घरोघरी व बाजारपेठेतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.

हा मुद्दा उपस्थित करत भाजपचे गटनेते सचिन नागपुरे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे, नगरसेविका शालिनी सुखधान, डॉ.निर्मला सांगळे, सीमा मापारी, अर्चना डोकडे, संगीता बर्डे यांनी नगरपंचायत कार्यालयाजवळ पडलेला कचरा गोळा करून नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्या दालनातील टेबल व खुर्च्यांवर टाकत निषेध केला. त्यानंतरही नगराध्यक्षा नगरपंचायत येथे न आल्याने स्वच्छ भारत अभियानचा नारा देत कचरा गाडीसह नगराध्यक्षा योगिता पिंपळे यांच्या घरासमोर जाऊन कचरा ओतला व निषेध नोंदवला. लवकरच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा अशी, मागणी केली. यावेळी भाजप नगरसेवकांसह संजय सुखधान, राजेंद्र मापारी, दत्तात्रय बर्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

माझ्या घरासमोर कचरा टाकणे हे योग्य नसून हे आंदोलन असंविधानिक आहे. तसेच एकीकडे स्वच्छतेसाठी आंदोलन करायचे आणि दुसरीकडे कचरा डेपोकडे जाणार्‍या गाड्या अडवायच्या हे म्हणजे दोन्ही बाजूने ढोल वाजवणे आहे. हे चुकीचे आहे. माझ्या घरासमोर कचरा टाकून प्रश्न सुटणार आहेत का? सर्व नगरसेवक व प्रशासन मिळून तोडगा काढणे आवश्यक आहे.
– योगिता पिंपळे, नगराध्यक्षा.

याअगोदर सर्वानुमते झालेले ठरावनंतर बदलले गेले असून ठराविक प्रभागातच कामे झाली आहे. या विशेष सभेत कामांच्या बाबतीत मागे राहिलेल्या प्रभागात निधी वापरण्यात आला आहे. शहर स्वच्छतेचे कंत्राट संपले असल्याने नगरपंचायतीने त्यावर मार्ग काढला, परंतू गाव स्वच्छ करण्यासाठी कचरा डेपोकडे गाड्या जाऊ दिल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. स्वच्छतेचे नवीन कंत्राट प्रक्रिया सुरू असून जनतेने तोपर्यंत सहकार्य करावे, कचरा डेपोकडे जाणार्‍या गाड्या विनाकारण अडवून नेवासकरांना वेठीस धरू नये. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष दालनात तसेच अध्यक्षांच्या घरासमोर कचरा टाकला ही बाब निषेधार्थ व निंदनीय आहे.
– नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष.

भाजपा नगराध्यक्ष काळात शहरातील प्रत्येक प्रभागात कामे व्हावीत म्हणून सर्वानुमते ठराव संमत केले. मात्र, क्रांतिकारी पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच सभेत भाजप, काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात कामासाठी निधी दिला नाही, तर फक्त क्रांतिकरीच्या नगरसेवकांच्या प्रभागात हा निधी वळविण्यात आहे. नगराध्यक्षा स्वतःहा नगरपंचायतमध्ये येत नसून त्यांचे पतीच त्यांचा कारभार पाहतात व कामात हस्तक्षेप करतात.
– सचिन नागपुरे, गटनेता भाजपा

ठेकेदाराकडून यापुर्वीच स्वच्छतेचे काम करण्याचे बंद केले आहे. परंतू नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने प्रभाग दोन मधील कचरा डेपो इतरत्र हलवावा, यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहे. यापुढे प्रभाग दोन मध्ये कचरा टाकू देणार नाही. प्रशासनाने शहरातील कचर्‍याची इतरत्र म्हणजे नगरपंचायतने खरेदी केलेल्या जागेत विल्हेवाट लावावी, अन्यथा नागरिकांना बरोबर घेऊन पुन्हा आंदोलन केले जाईल. खरेदी केलेल्या जागेचा व्यवहार रद्द करण्याऐवजी जागेचा दर कमी करण्याचा निर्णय का नाही घेतला याची कारणे शोधली पाहिजे.
शालिनी सुखधान (नगरसेविका)

- Advertisment -

ताज्या बातम्या