शेतकर्‍यांचा कांदा सडू लागला तरी घोडेगावचे मार्केट अद्याप बंदच !
Featured

शेतकर्‍यांचा कांदा सडू लागला तरी घोडेगावचे मार्केट अद्याप बंदच !

Sarvmat Digital

आधीच भावात प्रचंड घसरण त्यातच कांदा मार्केट बंद; नेवासा तालुक्यातील शेतकरी हवालदील

नेवासा (का. प्रतिनिधी)- तालुक्यातील एकमेव व जिल्ह्यात मोठे कांदा मार्केट असलेले नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे घोडेगाव कांदा मार्केट करोनामुळे बंद ठेवण्यात येऊन दोन महिने झाले तरीही ते पुन्हा सुरू करण्यात न आल्याने नेवासा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा विकायचा कुठे? असा प्रश्न उभा राहिला आहे.

राज्यात दोन महिन्यांपासून करोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्याचे तीन टप्पे होऊन चौथा टप्पा सुरू आहे. करोनामुळे शेती व शेतकर्‍यांना काहीच नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भाषणात सांगितले मात्र प्रत्यक्षात त्याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती मार्केटबाबत झालेली आहे. विशेष म्हणजे सरकारमधील मंत्रीमहोदयांच्या तालुक्यातील मार्केटच बंद आहे.

गेल्यावर्षी निर्माण झालेल्या कांदा टंचाईमुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे छोट्या शेतकर्‍यांनीही फायद्याच्या आशेने कांदा लागवड केली. या शेतकर्‍यांकडे साठवणुकीची सोयही नाही. त्यामुळे लगेच मार्केटला कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे करोनामुळे मार्केटच बंद ठेवले आहे. राज्यातील लासलगावसह निम्म्याहून अधिक कांदा मार्केट बंद ठेवले गेले नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची हिंमत तेथील मार्केट कमिट्यांनी दाखवली व शेतकर्‍यांचा कांदा स्विकारला. मात्र सोशल डिस्टन्सिंगची हमी घ्यायला घोडेगाव मार्केट कमिटीची तयारी नसल्याचे दिसते.

15 मार्चपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली गेली. परंतु तेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाल्याने कांद्याला कुठेच उठाव नसल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सहाशे रुपयांपर्यंत कोसळलेले आहेत. नेवासा तालुक्यात अवकाळी पावसामध्ये अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजल्याने तो सडला. काही शेतकर्‍यांचे कांदे साठवणुकीची सोय असतानाही सडू लागले आहेत. त्यातच कांदा खरेदीच बंद केल्याने शेतकर्‍यांपुढे मोठे संकट आहे.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये जवळपास 40 आडतदार आहेत. कांद्यासह शेतीमालावर कसलेच निर्बंध नसल्याचे केवळ बोलले जाते. प्रत्यक्षात कांदा व्यापार्‍याला एका दिवशी तीनशे क्विंटलपर्यंतच खरेदीचे घातलेले बंधन कायम आहे. या परिस्थितीत कांदा व्यापार्‍यांचीही कांदा मार्केट सुरू होण्याबाबत उत्सुकता नाही.
व्यापारी उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या हितासाठी म्हणून गाजावाजा करणार्‍या मार्केट कमिटीलाही प्रत्यक्षात शेतकर्‍यांचे काहीच घेणेदेणे नसल्याचे मार्केट सुरू करण्याबाबत असलेल्या अनास्थेतून दिसून येते.

संपूर्ण लॉकडाऊन उठल्यानंतरच कांदा खरेदी सुरू होईल अशी माहिती मार्केट कमिटीच्या सुत्रांकडून दिली जात आहे. म्हणजे शेतकर्‍यांना 1 जूनपर्यंत तरी कांदा विकता येणार नाही. शेतकर्‍यांचा कांदा मोठ्या प्रमाणात सडण्याची चिन्हे असून याची जबाबदारी घेणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. आधीच घसरलेले भाव त्यात मार्केट कमिटीही बंद यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com