मागणी थंडावल्याने कांद्याच्या भावात घसरगुंडी
Featured

मागणी थंडावल्याने कांद्याच्या भावात घसरगुंडी

Sarvmat Digital

राहुरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

राहुरी (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे काही बाजार समित्या बंद असून निर्यातही बंद असल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरगुंडी होत आहे. त्यातच परराज्यातील मागणी थंडावली असून व्यापार्‍यांची मागणीही कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर सरकारच्या भरवशावर बसलेल्या शेतकर्‍यांचा कांदा 900 रुपयांच्या हमीभावाने खरेदी करण्याचा आदेश जारी करण्यात आला असून हा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याने कांद्याला किमान 2 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तर कांद्याच्या अनुदानातही वाढ करण्याची मागणी होत आहे.

उसापाठोपाठ राहुरी तालुका हा आता कांद्याचे माहेरघर म्हणून परिचित आहे. मागील पाच वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यात कांद्याच्या लागवडीने उच्चांक गाठलेला होता. मुळा धरणाचे मुबलक पाणी, पोषक हवामान आणि राहुरी बाजार समितीसारखी शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव देणारी सहकारी संस्था, संपन्न बाजारपेठ, वाहतूक खर्च कमी आणि कमी दिवसांत येणारे नगदी पीक म्हणून राहुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत राहुरी तालुक्यात कांद्याला चांगला भाव मिळाल्याने राहुरी तालुक्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.

मात्र, सध्या कांद्याच्या भावाला लॉकडाऊनचा कोलदांडा बसला आहे. मागणीही कमी झाली असून आवक वाढू लागल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. सध्या उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू आहे. मात्र, बाजार समित्यांचे व्यवहार बंद असल्याने काढणी केलेला कांदा शेतातच क्वारंटाईन होत आहे. तर काही बागायतदार शेतकरी काढणी केलेला कांदा चाळीत साठवून ठेवत आहेत.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले व कांदा चाळ उभारण्याची क्षमता नसलेल्या शेतकर्‍यांचा कांदा शेतातच पडून राहिला आहे. सध्या परराज्यातही व जगातही लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. मागणीच घटल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता शासनानेच यातून शेतकर्‍यांची सोडवणूक करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मागील वर्षी कांदा उत्त्पादकांना 200 रुपये अनुदान देण्यात आले होते. मात्र, आता त्यात वाढ करून 500 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आले आहेत. कोणत्याच शेतमालाला फारसे ग्राहक नाही. सोन्यासारखे पीक कवडीमोल भावात विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com