शिर्डीत वृद्धाकडे आढळली 23 हजार रुपयांची रक्कम

शिर्डीत वृद्धाकडे आढळली 23 हजार रुपयांची रक्कम

पाकिटं आणि पर्स सापडल्याने संशय

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचा 500 रूम येथे भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात जळगाव येथील अर्जुन भीमा निवारे या 65 वर्षीय वयोवृद्ध इसमाकडे तब्बल 23 हजार रुपये आढळून आले.

दरम्यान वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरात असंख्य भाविक दाखल झाले आहेत. संस्थानच्या वतीने या भाविकांसाठी भक्तनिवास बाहेरही मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या 500 रूम येथील मंडपात मंगळवारी दुपारी 12 वाजून 45 मिनिटे च्या सुमारास सीआयएसएस चे सुरक्षा कर्मचारी परकारे आपली ड्युटी बजावत असताना त्यांना सदरील मंडपात एक 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती झोपलेली दिसून आली.

यावेळी सुरक्षारक्षक परकारे यांनी त्यास उठवून त्याची चौकशी व झाडाझडती घेतली असता त्याच्या जवळील गोणीमध्ये तसेच पॅण्टच्या खिशात व पॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल तसेच सुट्टे पैसे आढळून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सुपरवायझर तसेच सुरक्षा कार्यालयात याबाबत कळविले.

सदर व्यक्तीला मंडपातून त्याच्या बॅगसह कार्यालयात आणले व त्याच्या जवळील कांद्याची गोणी तसेच त्याच्या खिशातून व पाकिटातून पैशाची रक्कम एका टेबलवर ओतली असता यावेळी ती रक्कम किती होती याबाबत समजले नाही. मात्र त्यानंतर साधारणतः दोन वाजेच्या सुमारास म्हणजे एक तासानंतर त्या वृद्ध इसमास साईमंदिर परिसरातील सुरक्षा कार्यालयात सुरक्षा कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत एक सुपरवायझर व दोन खाजगी सुरक्षा रक्षक यांनी आणले असता त्याची सखोल चौकशी केली, मात्र या वयोवृद्ध निवारे नामक इसमाने सदर पैसे मी भीक मागून गोळा करीत असल्याचे सांगितले.

असे असले तरी सदर पैशाच्या बंडलामध्ये चार पुरुषांची पाकिटं तसेच चार महिलांच्या छोट्या पर्स आढळून आल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सदर पैशांची मोजदाद ही ऑनकॅमेरा केली असून यामध्ये 23 हजार 701 रुपये एकूण रक्कम असल्याचे सुरक्षा कर्मचार्‍यांनी सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com